सीमा दाते
कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट यशस्वीपणे थोपविण्यात आली. पण आता तिसरी लाटही सुरू झाली आहे. या लाटेत मृत्यूंची संख्या कमी असली तरी, कोरोनाचा आणि ओमायक्रॉनचा प्रसार मात्र वेगाने होत आहे आणि त्यामुळे रोज २० ते ३० टक्के कोरोना रुग्ण वाढत आहेत. एकीकडे कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे, तर दुसरीकडे फेब्रुवारी महिन्यात महापालिका निवडणूक अपेक्षित आहे. त्यामुळे सध्या महत्त्वाचं काय आहे, कोरोना की निवडणूक? असा प्रश्न मुंबईच्या जनतेला पडलाय.
सध्या कोरोना रुग्णांची संख्या २० हजारांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका चिंतेत असताना काही राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं देखील पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्य सरकार लॉकडाऊन लागू करण्याच्या तयारीत नसल्याचं सांगत आहे आणि दुसरीकडे फेब्रुवारीपर्यंत मात्र नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे मिनी लॉकडाऊन सुरू झाले असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, फेब्रुवारीपर्यंत नियमावली आणि फेब्रुवारीतच निवडणूक अपेक्षित असल्याने कोरोना आणि निवडणुकीचं समीकरण चांगलेच जुळले असल्याचं पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, काही राजकीय पक्ष या कोरोनाच्या दरम्यान जोरदार निवडणुकीच्या तयारीला लागले असल्याचं पाहायला मिळत आहे. जिथे कोरोनाचे नियम पाळायचे आहेत, तिथे निवडणुकीची तयारी सुरू असल्याचे दिसत आहे.
सध्या मुंबईचा विचार करता महापालिकेने कोरोनाला रोखण्याची मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी रुग्णालय, कोविड सेंटर सुरू केले, ऑक्सिजन बेड तयार केले आहेत. लोकांपासून कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून त्रिसूत्री आखण्यात आली आहे. सध्या कोरोना रुग्णसंख्या २० हजारांच्या पुढे गेली असली तरी, कोरोनामुळे बरी झालेली रोजची रुग्णसंख्या देखील ६ हजारांच्या पुढे आहे; त्यामुळे काहीसा दिलासा देखील मुंबईकरांना मिळत आहे.
एकीकडे पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू असली तरी कार्यकर्ते संभ्रमात आहेत. कोरोनाच्या नियमांमुळे तयारी कशी करायची, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कोणत्याही राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी निर्बंध आहेत; त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगळा मार्ग अवलंबवावा लागणार आहे. विशेष म्हणजे, कोरोना काळात अनेक राजकीय पक्ष जनतेच्या पाठीशी उभे राहिले होते, त्यांना आर्थिक मदत, जेवण पोहोचवणे अशी अनेक सामाजिक कामे केलेली आहेत. मात्र सध्या निवडणुकीपेक्षा महत्त्वाचं आहे ते, कोरोना हद्दपार होणं! पालिका प्रशासन मोठ्या जििकरीने कोरोना हद्दपार होण्यासाठी प्रयत्न करत आहे; पण त्याला साथ सगळ्या जनतेची देखील हवी आहे.
सध्याची तिसरी लाट पाहता या लाटेत अनेक मोठ्या राजकीय नेत्यांना आणि अभिनेत्यांना देखील कोरोनांने घेरले आहे; त्यामुळे कोरोनाची सर्वत्र भीती पसरलेली पाहायला मिळते. त्यातच निवडणुका जोपर्यंत जाहीर होत नाहीत, तोपर्यंत राजकीय नेते स्वतः मैदानात उतरताना दिसणार नाहीत. आधीच मुंबईतील प्रभाग वाढवल्यामुळे, प्रभागांची फेररचना पालिकेला करावी लागली आहे. यात आधीच कालावधी गेलेला असताना अजूनही त्याला वेळ लागणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक अपेक्षित वेळेनुसार न होता पुढे देखील जाऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सध्या तरी राजकीय पक्षांनी निवडणुकीपेक्षा कोरोनावर लक्ष केंद्रित केले, तर बरं होईल, असं सामान्य जनतेचं म्हणणं आहे.
सध्या राज्य सरकारने जाहीर केलेली नियमावली ही सगळ्याच जनतेला पाळणे गरजेचं आहे. नव्या नियमावलीनुसार रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी, पर्यटन स्थळे, उद्याने, मैदाने सगळेच बंद करण्याचे निर्देश आहेत; त्यामुळे काही दिवस मिनी लॉकडाऊनचे पालन करावे लागणार आहेत. जोपर्यंत कोरोनाची तीव्रता कमी होत नाही, तोपर्यंत कोरोनाचे हे निर्बंध असणार आहेत. तर फेब्रुवारीत काही प्रमाणात लाट ओसरणार असल्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे सरकारचे नियम पाळणे गरजेचे आहेच.
सध्या पालिका प्रशासन आणि स्वतः महापौर या सगळ्यात लक्ष घालताना दिसून येत आहे. जे मास्क वापरत नाहीत, त्यांना मास्क वापरायला सांगणे, रुग्णालयातील आरोग्य सुविधा तपासणे या सगळ्यात महापालिकेचे कौतुक आहेच; पण काही बेजबाबदार नागरिक जे विनामास्क फिरत आहेत, त्यांनीही आता जबाबदार होणं गरजेचं आहे.