मुंबई : सद्यपरिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव सर्वत्र वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तातडीने उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय आणि सर्व तहसिलदार कार्यालय येथे कोविड-१९ कॉल सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहेत.
या कॉल सेंटरशी संपर्क साधून नागरिक कोविड-१९, बेड व्यवस्थापन, ॲम्बुलन्स तसेच अन्य वैद्यकीय सुविधा याबाबतची माहिती विचारू शकतात, वैद्यकीय मदत व मार्गदर्शन मिळवू शकतात. महत्वाचे म्हणजे जे नागरिक गृह विलगीकरणात आहेत, त्यांच्याशी या कॉल सेंटरच्या माध्यमातून सतत संपर्क ठेवला जाणार असून त्या नागरिकांच्या आरोग्याविषयी सतत माहिती घेतली जाणार आहे. त्यांना कुठल्याही मानसिक किंवा वैद्यकीय मदतीची गरज भासल्यास त्यांना ती मदत तात्काळ उपलब्ध करून दिली जाणार आहे.
जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या जरी वाढत आहे तरी नागरिकांनी काळजी करू नये तर काळजी घ्यावी. जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्या आरोग्याच्या उपाययोजनांसाठी सर्व प्रकारची सज्जता ठेवलेली आहे. जिल्हा प्रशासन अहोरात्र सतर्क आहे. मात्र नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, मास्क वापरावा, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, सॅनिटायजरचा वापर करावा, हात वारंवार स्वच्छ धुवावेत, कोविड अनुरूप वर्तनाचे काटेकोर पालन करावे, कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, प्रशासन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर आहे.
कोविडच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.