Thursday, July 18, 2024
Homeक्रीडामोहन बागान चौथे स्थान राखेल?

मोहन बागान चौथे स्थान राखेल?

पणजी (वृत्तसंस्था) :हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) नववर्षातील ‘सॅटर्डे स्पेशल’ सामन्यांतील(८ जानेवारी) पहिल्या लढतीत एटीके मोहन बागानची गाठ ओदिशा एफसीशी पडणार आहे. गेल्या सलग पाच सामन्यांतील अपराजित मालिका कायम राखतानाच गुणतालिकेतील चौथे स्थान कायम राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

फातोर्डातील पीजीएन स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात एटीकेचे पारडे थोडे जड आहे. नवे प्रशिक्षक हुआन फेरँडो यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन बागानने पराभव पाहिलेला नाही. मागील लढतीत हैदराबाद एफसीविरुद्ध त्यांना २-२ अशा बरोबरीत समाधान मानावे लागले तरी नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी आणि एफसी गोवाविरुद्धच्या विजयाने मोहन बागानने ‘टॉप फोर’मध्ये स्थान राखले आहे. त्यांच्या खात्यात ९ सामन्यांतून १५ गुण आहेत.

एटीकेने यंदाच्या हंगामात प्रतिस्पर्ध्यांवर २० गोल चढवले असले तरी १८ गोल खाल्लेत. केवळ एका सामन्यात त्यांनी प्रतिस्पर्धी संघाकडून गोल खाल्लेला नाही. त्यामुळे मोहन बागानसमोर आक्रमणाची धार राखताना बचाव अधिक भक्कम करण्याचे आव्हान आहे. शनिवारच्या लढतीत यजमान संघाला स्टार खेळाडू ह्युगो बॉमॉसविना खेळावे लागणार आहे. ओदिशा एफसीविरुद्ध त्याला चौथ्यांदा पिवळे (यलो) कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे एका सामन्याला मुकावे लागेल. फ्रान्सच्या बॉमॉसने पाच गोल करताना तीन गोल करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. आठव्या आयएसएल हंगामात सर्वाधिक गोल करण्यात तोच आघाडीवर आहे. दुखापतगस्त कार्ल मॅकह्युग हाही शनिवारच्या लढतीसाठी उपलब्ध नाही.

ह्युगो बॉमॉसच्या अनुपस्थितीत रॉय क्रिष्णा आणि डेव्हिड विल्यम्स यांना एकत्र मैदानात उतरवणार का, असे विचारले असता, नव्या प्रतिस्पर्ध्याशी दोन हात करण्यास आम्ही उत्सुक आहोत. ओदिशाविरुद्ध सर्वोत्कृष्ट लाइनअप उतरवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे एटीकेचे प्रशिक्षक हुआन फेरँडो यांनी म्हटले आहे.

मागील लढतीत गतविजेता मुंबई सिटी एफसीविरुद्धच्या ४-२ अशा मोठ्या विजयानंतर ओदिशा एफसीचा आत्मविश्वास उंचावला आहे. कर्णधार जेरी मॅविमिंगथांगाचा भन्नाट फॉर्म ओदिशासाठी जमेची बाजू आहे. त्याच्या सर्वोत्तम दोन गोलांच्या जोरावर ओदिशाने मुंबई सिटीला हरवून सलग चार विनलेस सामन्यांची मालिका खंडित केली.

एटीके मोहन बागान हा आयएसएलमधील सर्वोत्तम संघ आहे. मात्र सातत्य राखताना गुणतालिकेत वरचे स्थान मिळवण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे ओदिशा एफसीचे मुख्य प्रशिक्षक किको रॅमिरेझ यांनी म्हटले आहे. ओदिशा एफसीचे ९ सामन्यांतून १३ गुण झाले असून गुणतालिकेत ते सातव्या स्थानी आहेत. मोहन बागानला रोखल्यास ओदिशाला अव्वल चार संघांमध्ये धडक मारण्याची संधी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -