Friday, July 19, 2024

नामघोष

राजाधिराज श्री भालचंद्र महाराज की जय!

एके दिवशी असा अद्भुत चमत्कार घडला की, भालचंद्र रात्री घरात झोपले असता सुमारे बाराच्या सुमारास तो झोपेतून उठून बिछान्यावर बसला व मोठमोठ्याने टाळ्या वाजवून ‘‘श्रीराम जयराम जय जय राम, ‘श्रीराम जयराम जय जय राम’ या महान मंत्राचा मोठमोठ्याने नामघोष करू लागले. घरातील व शेजारीपाजारी सर्व मंडळी जागी होऊन आश्चर्यचकित झाली. त्यांनी त्यांची नानाप्रकारे विचारपूस करून पाहिली पण व्यर्थ! ते डोळे मिटून पाषाणासारखे बसले होते. हा हा म्हणता ही गडबड ऐकून गावातील सर्व मंडळी तिथे जमली व एकाएकी हा काय प्रकार घडला, या विचाराच्या जाळ्यात सर्व मंडळी गुरफटून त्याच्याकडे पाहत होती; परंतु भालचंद्रांचा रामनामाचा घोष यंत्रासारखा चालू होता.

अशी ही त्याची आश्चर्यकारक स्थिती पाहून अनेकांनी अनेक तर्क काढले. कोणी म्हणाला, यांना साक्षात्कार झाला, तर दुसरा म्हणाला, त्यांना भूतबाधा झाली. म्हणून त्यांच्यावर नाना प्रकारचे इलाज करून पाहिले. गंडे, दोरे बांधून पाहिले. असे होता होता आठ दिवस लोटले; परंतु भालचंद्रांत काहीच सुधारणा झाली नाही. त्यांनी हळूहळू खाणेपिणे सर्व व्यर्ज्य केले. सतत नामजप चालू ठेवला.

संत रामदास स्वामींच्या जीवनात त्यांच्या बालपणात असाच प्रकार घडला होता. दासांनी आपल्या मोठ्या बंधूजवळ मला गुरुमंत्र द्या, असा हट्ट धरला होता; परंतु तुझे वय लहान असल्याने तुला मंत्रोपदेश देता येत नाही. असे त्यांनी सांगितले असता, रामदास रागाने देवळात जाऊन झोपला. तिथे योग असा आला की, बाल रामदासाची भगवंताला दया येऊन त्याने त्यांना झोपेतून उठवून ‘श्रीराम जयराम जय जय राम’ असा महामंत्र दिला. रामदास मोठमोठ्याने तो जप करू लागले तेव्हा सर्व मंडळी अशीच आश्चर्यचकित झाली होती.
तीच अवस्था भालचंद्रांची झाली. गावातील लोक फार हळहळले. कारण, आपल्या सात्त्विक गुणामुळे आणि अचूक ज्योतिषाने त्यांनी अलोट लोकप्रियता संपादन केली होती.
(क्रमश:)
राजाधिराज श्री
भालचंद्र महाराज की जय!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -