मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुणे विभागातून राज्यातील सुमारे ९० टक्के मार्ग बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना खासगी बस शिवाय पर्याय नाही. परिणामी खासगी बस व्यावसायिक अवाच्या सव्वा तिकीट दर आकारत असल्याने ते जोमात असून, एसटी कोमात असल्याचे चित्र आहे.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून संपात सहभागी झाले आहेत. संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारने थेट खासगी बसगाड्यांना एसटी आगारातून प्रवासी बस वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर २५० ते ३०० किलोमीटर मार्गावर पश्चिम महाराष्ट्रात (मुख्यत्वे सातारा, कोल्हापूर, सांगली, ठाणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद) बसगाड्या स्थानकावरून धावत आहेत. मात्र लांब पल्ल्याच्या (नागपूर, अमरावती, गडचिरोली, भंडारा, लातूर, उस्मानाबाद, बीड) मार्गावर धावणाऱ्या गाड्या स्थानकावर दाखलच झाल्या नाहीत. या मार्गासाठी खासगी बसच्या कार्यालयातून बुकिंग घेतले जाते. खासगी बसच्या दरावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने मनमानी करून अवाच्या सव्वा तिकीट दर आकारले जात असल्याचे दिसून येत आहे.