नवी दिल्ली : देशात ओमायक्रॉनचे संकट वाढत असताना आता आयसीएमआरने आज ओमिशुअर या कीटला (Omisure kit) मंजूरी दिली आहे. ओमिशुअर कीटच्या माध्यमातून ओमायक्रॉन व्हेरीअटंची लागण झाली की नाही याचे निदान करता येणार आहे. त्यामुळे आता ओमायक्रॉनचे (Omicron) निदान करण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही.
देशात कोरोनाचा नवीन व्हेरीअंट ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या १५ दिवसांत दिल्ली आणि महाराष्ट्रासह ओमायक्रॉनची प्रकरणं झपाट्यानं वाढली आहेत. त्यातच आयसीएमआरने एक मोठा निर्णय घेतला आहे. आयसीएमआरने पहिल्या ओमायक्रॉन डिटेक्शन किटला मान्यता दिली आहे. टाटा मेडिकलने हे कीट तयार केले आहे. या कीटचे नाव ओमिशुअर असे आहे.
दरम्यान, देशात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांमध्ये वाढ दिसत आहे. भारतात सोमवारी दिवसभरात ३७ हजार ३७९ नवे रुग्ण आढळले. तर ११ हजार ७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. दिलासा देणारी बाब म्हणजे मृतांचा आकडा कमी आहे. गेल्या २४ तासात देशात १२४ जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले.
सध्या दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा ३.२४ टक्के इतका आहे. देशातील सक्रीय रुग्णांची संख्या १ लाख ७१ हजार ८३० इतकी झाली आहे. तर आतापर्यंत एकूण ३ कोटी ४३ लाख ६ हजार ४१४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोनामुळे आजपर्यंत ४ लाख ८२ हजार १७ जणांचा मृत्यू झाला आहे.