जव्हार ग्रामीण :३ जानेवारी ते १२ जानेवारी जिजाऊ ते सावित्री, सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा या अभियाना अंतर्गत जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शिरोशी येथे सोमवार दिनांक ३ जानेवारी रोजी बालिका दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये शाळेतील सर्व चिमुकल्या विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारली होती. यावेळी शाळेच्या वतीने सर्व सावित्रीच्या लेकींचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तसेच, सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजनही विद्यार्थिनींनीच्या हस्तेच करण्यात आले.
बालिका दिनानिमित्त सावित्रीबाईंच्या जीवनपटाविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी शालेय विद्यार्थी, अंगणवाडी सेविका सुनंदा भोये, मदतनीस जयश्री कामडी, ग्रामसेवक बळवंत गवळी, शाळेचे मुख्याध्यापक संदीप खेडकर, शिक्षक राजू महाला तसेच प्रवीण तांबडा, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.