Monday, July 22, 2024
Homeसाप्ताहिककोलाजनववर्षाचे स्वागत जगा वर्तमानकाळात

नववर्षाचे स्वागत जगा वर्तमानकाळात

Always remember : once you have lived the moment it is past.
Then drop it. Howsoever beautiful it was; don’t cling to it.
When it is no more, it is no more — Osho

केशवसुतांनी म्हटले आहे,
‘जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळूनि किंवा पुरूनि टाका,
सावध ऐका पुढल्या हाका…’

त्याच धर्तीवर ओशो रजनीश यांनी भूतकाळाबद्दल आपले विचार मांडले आहेत. नव्या वर्षाचे स्वागत करताना आपण गत वर्षाचा आढावा घेतो, त्यावेळी जाणवते आज मी तेच काम वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या प्रकारे केले असते. वयाप्रमाणे ज्ञानात, अनुभवात, विचारात फरक पडतो. भूतकाळाकडून झालेल्या चुका सुधारा, पण भूतकाळात अडकून बसल्यास, चिकटून राहिल्यास, प्रगती खुंटेल. तसेच आपण येत्या वर्षात काय करायचे याची आखणी आखा; परंतु त्या भविष्याच्या दिवास्वप्नात फक्त रममाण झाल्यास हाती असलेला वर्तमानकाळ निघून जाईल. तेव्हा युवकांनो, जगा वर्तमानकाळात. वर्तमानात जगणाऱ्यांकडे यश चालून येते. म्हणून पंडितांनी वर्तमान क्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. या नववर्षदिनी स्वतःच्या जगण्याला कोणती दिशा द्यायची, कोणता रस्ता पकडायचा हे स्वतःच ठरविले पाहिजे. त्यासाठी स्वतःशी संवाद साधा. प्रत्येक उगवणाऱ्या दिवसाला आजचा दिवस माझा आहे, असे समजून कामाला लागा. काम करताना जगण्याचा हेतू समजून घ्या.

चार-पाच वर्षांपूर्वी संदीप वासलेकर सरांचा नववर्षाचा सकाळमधील लेख मनात घर करून आहे. युवकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना ते म्हणाले होते, ‘कोट्यधीश हो! अब्जाधीश हो!’ जे सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, विचारवंत, लेखक हे जेवढ्या लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणतात, जेवढ्या लोकांच्या आयुष्यावर ते सकारात्मक परिणाम घडवून आणतात, तेवढ्या प्रमाणात ते लक्षाधीश, कोट्यधीश, अब्जाधीश होतात. नारायण मूर्ती यांनी दोन लाख लोकांना नोकरी दिली म्हणजे पाच लाख लोकांचे भले केले. भ्रष्टाचारविरोधी चळवळ सुरू करून भारतातील एक अब्ज लोकांच्या मनास स्पर्श केला म्हणून अण्णा हजारे अब्जाधीश, नारायण मूर्ती लक्षाधीश. एकेकाळी भारतात स्वामी विवेकानंद, महर्षी कर्वे, महात्मा गांधी असे अनेक कोट्यधीश होऊन गेले. येथे सत्तेसाठी लोकांची मन जिंकणारे किंवा करमणुकीतून लोकांचे मन जिंकणारे खेळाडू, नट ते यात येत नाहीत; परंतु जे लोकांच्या जीवनात फार मोठा बदल घडवून आणतात ते लक्षाधीश, अब्जाधीश होत. जागतिक नेते बिल गेट्स, सर्जी ब्रिन व मार्क झुकरबर्ग यांनी संगणक, गुगल, फेसबुक आणून अब्जावधी लोकांच्या जीवशैलीवर परिणाम केला. ते अब्जाधीश होत.

आज कोट्यधीशांची कमतरता आहे. तेव्हा ‘युवकांनो! नव्या वर्षाच्या शुभेच्छा, कोट्यधीश हो, अब्जाधीश हो!’
युवकांनो! भोवताली काय घडतंय हे जाणून घ्या. तुम्हाला संधी आहे. सर्वांना समर्पित असणारे काम करा. लक्षात ठेवा, आपले काम हा आपल्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो.

महान इटालियन चित्रकार, शिल्पकार मायकेल अँजेलोच्या खात्यावर अनेक सर्वोत्तम शिल्पे व चित्रे नोंदवलेली आहेत. या यादीत सर्वात वरचे नाव डेव्हिडचा पुतळा आणि पिएटा शिल्प होय. डेव्हिड हे केवळ शक्तीचे प्रतीक न राहता फ्लॉरेन्समधील नागरिकांचे प्रतीक बनले आहे.
मायकेल एन्जेलोच्या जन्माआधीपासून एक प्रचंड ठोकळावजा संगमरवरी तुकडा एका चर्चच्या आवारात अनेक वर्षे पडून होता. बऱ्याच महान कलावंतांनी तो दगड दोषपूर्ण व निकामी ठरविला होता. मायकेल शिल्पाकृतीवर काम करीत असताना एका मुलाने विचारले, तो असा दगडावर हातोडा का आपटत बसला आहे? मायकेल म्हणाला, तरुण मुला, यात एक देवदूत राहतो त्याला मी मुक्त करीत आहे.

बारीकसारीक सूक्ष्म तरल बारकावे दाखविण्यासाठी मायकेलचा बराच वेळ जात होता. एका माणसाला वेळेचा अपव्यय वाटून, न राहून त्याने मायकेलला विचारले, तू असं का करतोस? मायकेल म्हणाला, ‘किरकोळ अशा वाटणाऱ्या गोष्टींतूनच परिपूर्णता येते आणि परिपूर्णता ही किरकोळ बाब नव्हे.’ मायकेल एंजोलोने एका मृत ठोकळ्याला जिवंत करण्याची किमया साधली आणि अजरामर डेव्हिड शिल्प उभे केले.
बरेचजण काम करताना फक्त पाट्या टाकतात. तुम्ही काम करताना तुमच्या कामाचा अन्वयार्थ कसा लावता? निव्वळ दगडफोड्या की स्वतःला सर्वोत्तम कॅथेड्रेलचे शिल्पकार? चांगल्याप्रकारे केलेले काम हाच उद्याचा भरवसा असतो. चांगल्या कामाची कदर/बक्षीस सावकाशीनेच मिळते.

युवकांनो! स्वतःलाच संधी द्या. लक्षात ठेवा, तुम्ही स्वतः टाकाऊ दगडाचा तुकडा नाही. उचला छिन्नी-हातोडा आणि स्वतःमधील अनावश्यक दगड काढून टाका. चांगल्या कामासाठी खरे पाहता नववर्षाचीही आवश्यकता नसते. तरी नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. पुढचे पान उलटा, दगडाला आकार देण्याची नवीन पद्धत सापडेल. वर्तमानात जगत नववर्षाचे स्वागत करताना, स्वतःमधील विजेत्याला निर्माण करा.
mbk1801@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -