Sunday, January 25, 2026

पनवेलच्या डायलेसिस सेंटरचे अदिती तटकरे यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

नवीन पनवेल : पनवेल शहरातील तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात डायलेसिस सेंटरसाठी तज्ज्ञांची निवड करून सेंटर सुरू करण्याची मागणी पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार पालक मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते २ जानेवारीला येथील डायलिसिस सेंटरचे उद्घाटन होणार आहे. याचा लाभ शेकडो गरीब रुग्णांना होणार आहे.

पनवेल शहरातील तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू करण्यास काही महिन्यांपासून लागणारी उपकरणेही येथे बसवण्यात आलेली आहेत. परंतु तज्ज्ञांची निवड करण्यात आली नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. रायगड जिल्ह्यातून येथे उपचार घेण्यासाठी अनेक रुग्ण येत असतात.

किडनी आणि मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे खर्चिक असल्याने जिल्ह्यातील रुग्ण दगावण्याची संख्याही वाढत आहे. त्यामुळे तातडीने संबंधित विभागास आदेश देऊन नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञांची निवड करून सेंटर सुरू करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेविका प्रीती जॉर्ज, डॉक्टर सुरेखा मोहोकर, सारिका भगत यांनी राज्याच्या राज्यमंत्री आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले असून नवीन वर्षात डायलेसिस सेंटर सुरू होत असल्याने पनवेलकराना ही नववर्षाची भेट आहे.

गरजूंना होणार लाभ 

पनवेलचे डायलेसिस सेंटर सुरू होत असल्याने त्याचा लाभ गोरगरीब आणि गरजू नागरिकांना होणार आहे. सेंटर सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला, त्याला यश आले. सर्वांना धन्यवाद. - प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेते, पनवेल महापालिका

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >