मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेड हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. यजमानांपूर्वी, पाहुण्या इंग्लंड संघांत बाधीत आढळल्याने अॅशेस क्रिकेट मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांवर अनिश्चतेतेचे सावट आहे.
मेलबर्न कसोटी जिंकल्यानंतर सिडनीला रवाना होण्यापूर्वी शुक्रवारी केलेल्या रूटीन चाचणीमध्ये हेडमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली. त्यानंतर त्याला तातडीने विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कोरोनाची लागण झाल्याने मॅथ्यू हेडचा चौथ्या कसोटीत (सिडनी) संघनिवडीसाठी विचार केला जाणार नाही.
खबरदारीचा उपाय म्हणून ऑस्ट्रेलिया संघात मिचेल मार्श, निक मॅडिसन आणि जोस इंग्लिस यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, संघात राखीव असलेला आघाडीचा फलंदाज उस्मान ख्वाजाला हेडच्या जागी संघात स्थान मिळू शकते. हेडमध्ये प्राथमिक लक्षणे आढळून आल्याने पाचव्या आणि अंतिम कसोटीमध्ये तो खेळू शकतो, असे ऑस्ट्रेलिया बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हेडची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने ऑस्ट्रेलिया संघाचे सिडनीसाठीचे प्रयाण उशिराने झाले. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ वेगवेगळ्या चार्टर्ड विमानाने चौथ्या कसोटीसाठी मार्गस्थ झाले.
इंग्लंडचे प्रशिक्षकही विलगीकरणात
पाहुणा इंग्लंड संघ प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड यांच्या विना सिडनीला रवाना झाला. त्यांच्या कुटुंबातील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. ट्रॅव्हिस हेडप्रमाणे तेही चौथ्या कसोटीमध्ये सहभागी होणार नाही. त्यांनाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सिल्व्हरवुड सहभागी होणार नसल्याने चौथ्या कसोटी पाहुणा संघ कोचच्या मार्गदर्शनाविना खेळेल.
मॅच रेफ्री बूनही पॉझिटिव्ह
आयसीसी मॅच रेफ्री आणि ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड बूनही कोरोना पॉझिटिव्ह ठरले आहेत. अॅशेस मालिकेत मॅच रेफ्री म्हणून ते कार्यरत आहेत. विषाणूची लागण झाल्याने बून यांच्या जागी स्टीव्ह बर्नार्ड यांची नियुक्ती झाली आहे. त्यांचे न्यू साउथ वेल्समध्ये वास्तव्य असते.
उर्वरित अॅशेस मालिका अनिश्चितेतेच्या भोवऱ्यात
ऑस्ट्रेलियात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. न्यू साउथ वेल्समध्ये शुक्रवारी २१ हजार नवे कोरोना पेशंट आढळून आले. अॅशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंड संघाच्या सपोर्ट स्टाफमधील काही जण बाधित झाल्याचे आढळून आले. त्यानंतर बाधितांना विलगीकरणात ठेवण्यात आले. इंग्लंडच्या सपोर्ट स्टाफला कोरोना झाल्यानंतर ऑस्ट्र्रेलिया बोर्डाने विशेष खबरदारी घेत, मालिका निविघ्न पार पडेल, असे म्हटले होते. मात्र, आता यजमान ऑस्ट्रेलियाच्या कंपूमध्ये कोरोना शिरल्याने उर्वरित मालिका अनिश्चिततेच्या भोवऱ्यात आहे. तीन सामन्यांनंतर ऑस्ट्रेलियाकडे ३-० अशी विजयी आघाडी आहे. पिछाडीवर पडलेल्या इंग्लिश संघासमोर उर्वरित सामन्यांत उरलीसुरली प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान आहे.
………