
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पूर्वपरीक्षांची तारीख पुढे ढकलली आहे. त्यामुळे २ जानेवारीला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. येत्या २ जानेवारी रोजी राज्यभर होऊ घातलेल्या एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय आयोगामार्फत जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या निर्णयासोबत ही परीक्षा पुन्हा कधी घेतली जाणार, याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. आयोगाने जारी केलेल्या निवेदनामध्ये परीक्षेचे सुधारित वेलापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे एमपीएससीच्या उमेदवारांचे नियोजन पुन्हा एकदा बिघडले आहे. राज्य लोकसेवा आयोगातर्फे मंगळवारी २८ डिसेंबर रोजी यासंदर्भातलं परिपत्रक आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आले आहे.
‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्यामुळे काही उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली असल्यामुळे परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासनाकडून निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आयोगामार्फत रविवारी दिनांक २ जानेवारी रोजी नियोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.