मुंबई : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकारने विधानसभा निवडणुकीबाबत राज्यपालांना चार पत्र लिहिले होते. मात्र, तांत्रिक कारणास्तव ही निवडणूक शक्य नसल्याचे राज्यपालांनी म्हटले होते. त्यानंतरही महाविकास आघाडी सरकारकडून या निवडणुकीसाठी प्रयत्न सुरू होते. आता मात्र, ही निवडणूक लांबणीवर गेली असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही निवडणूक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाच्या कार्यक्रम पत्रिकेत अध्यक्ष निवडीबाबत कोणताच उल्लेख नाही. त्यामुळे आघाडी सरकारनं अध्यक्ष निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला की काय? अशी चर्चा सुरु झाली होती. सत्ताधारी तीनही पक्षांनी त्यांच्या आमदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. अखेरच्या दिवशी नाट्यमय राजकीय घडामोडी घडतात का याकडे लक्ष लागले होते.
निवडणूक पुढे जाण्याची कारण
ज्य सरकारच्या पत्राला राज्यपालांनी उत्तर धाडलं असलं तरी त्यात काय संदेश दिलाय हे अद्याप समोर आलेलं नाही. एकीकडे काँग्रेस निवडणुकीसाठी आग्रही असताना सत्ताधारी आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांनी मात्र राज्यपालांच्या संमतीशिवाय निवडणूक घेऊ नये अशी भूमिका घेतल्याचं कळतं. विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही निवडणूक घेण्यास विरोध दर्शवलाय. त्यामुळे अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी अध्यक्षपदाच्या निवडणूक बारगळणार असल्याचे वृत्त आहे. तर, दुसरीकडे आघाडीच्या नेत्यांनी कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरू केली आहे.