Monday, July 22, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखनकला व अंगविक्षेप,विधिमंडळात आक्षेपार्ह

नकला व अंगविक्षेप,विधिमंडळात आक्षेपार्ह

जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, म्हणतात ते तंतोतंत खरं आहे, याचा प्रत्यय बुधवारी राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आला आणि महाराष्ट्रातील जनतेने विशेषतः कोकणवासीयांनी त्यांचा लोकप्रतिनिधी विधानसभेत कसा तोंडावर आपटला हे दूरदर्शनवरील थेट प्रक्षेपणातून पाहिले. त्यावेळी त्यांना त्या लोकप्रतिनिधींचा आणि अशा माणसाला आपण निवडून दिले म्हणून स्वतःचाही राग आला असेल. खरं म्हणाल तर आपण सर्वसामान्य जनता मोठ्या अपेक्षेने आपले नगरसेवक, आमदार, खासदार असे लोकप्रतिनिधी यांना निवडून देतो. या भल्या माणसांनी, स्थानिकांच्या समस्या सोडविण्याबरोबरच आपल्या मतदारसंघाचा विकास घडवून आणण्याकडे कटाक्षाने लक्ष पुरवायला हवे.

पाच वर्षांसाठी निवडून देणाऱ्या आपल्या जनतेच्या अडीअडचणी त्यांनी सोडवायला हव्यात. केवळ ‘‘मोठमोठ्या बाता, और कुछ नही करता’’ अशी गत त्यांची होऊ नये, अशी सगळ्यांचीच अपेक्षा असते. पण जनतेने मोठ्या विश्वासाने वारंवार संधी देऊनही काही लोकप्रतिनिधी सुधारत नाहीत, तेव्हा फारच वाईट वाटते आणि आपण अशा भंपक माणसाला का निवडून दिले? असा प्रश्न पडतो व स्वतःचीच कीव करावीशी वाटते. अशीच गत सध्या गुहागरच्या नागरिकांची निश्चित झाली असणार. कारण या विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांच्यात गेल्या कित्येक वर्षांपासून काहीच सुधारणा झालेली दिसत नाही. त्यांचा बोलघेवडेपणा, वाकडेतिकडे अंगविक्षेप करून मोठमोठ्याने बोलणे, समोरच्याला तुच्छ लेखणे, नौटंकी करणे हे आक्षेपार्ह आहे. याच बेताल वागण्यामुळे भर विधानसभेत त्यांच्यावर बिनशर्त माफी मागण्याची वेळ आली आणि त्याच वेळेस त्यांच्या मतदारसंघातील जनतेला शरमेने मान खाली घालावी लागली असेल.

त्याचे झाले असे, ऊर्जामंत्री नितीन राऊत हे एका प्रश्नावर उत्तर देत असताना या सगळ्या वादाची सुरुवात झाली. यावेळी कोरोनामुळे आपल्याला १०० युनिट वीज मोफत देण्याच्या आश्वासनाची पूर्तता करता आलेली नाही, हा मुद्दा उपस्थित झाला. त्यावेळी राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रत्येकाच्या खात्यावर १५ – १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, असा उल्लेख केला. तेव्हा विरोधी
पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे आश्वासन कधीच दिलेले नाही, असा दावा केला. त्यावर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी जागेवर उभे राहत नरेंद्र मोदी यांची नक्कल करत काही वाक्य बोलून दाखवली. जाधव यांनी सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्यामुळे विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाला. हे पाहून देवेंद्र फडणवीस यांच्या संतापाचा पारा चढला.

सभागृहात देशाच्या पंतप्रधानांची नक्कल करणे हे योग्य नव्हे. सभागृहात अशा प्रकारचा पायंडा पडता कामा नये, असे फडणवीस यांनी सुनावले. तसेच जाधव यांनी माफी मागावी, अशी मागणी फडणवीस आणि भाजप आमदारांनी जोरदारपणे लावून धरली. तरी भास्कर जाधव हे काही केल्या ऐकायला तयार नव्हते. नरेंद्र मोदी यांनी ते वक्तव्य पंतप्रधान होण्यापूर्वी केले होते. त्यामुळे मी पंतप्रधान नव्हे, तर भाजपच्या एका उमेदवाराची नक्कल केली, असा याचा अर्थ होऊ शकतो, असा युक्तिवाद जाधव यांनी केला आणि माफी मागण्यास नकार दिला. त्यानंतर मात्र भाजपच्या आमदारांनी सभागृहाचे कामकाज चालू दिले नाही. त्यावर भास्कर जाधव यांनी मी माझे शब्द आणि अंगविक्षेप मागे घेतो, असे म्हटले.

मात्र, अंगविक्षेप मागे घेण्याचे कोणतेही आयुध उपलब्ध नाही. भास्कर जाधव अजूनही हा विषय थट्टेने घेत आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी आपल्या अधिकारांचा वापर करून त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. पंतप्रधानांचा असा अवमान होणार असेल, तर हक्कभंग आणला जाईल. त्यांनी अंगविक्षेप केल्याचे मान्य केले आहे. त्यांनी माफी ही मागितलीच पाहिजे, असा आग्रह फडणवीस यांनी धरला. तरी त्यावर मी माफी मागू शकत नाही, मी शब्द मागे घेतले आहेत, असे जाधव म्हणाले.

बराच वेळ जाधव यांनी आपलेच म्हणणे खरे असल्याचे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यानंतरही सभागृहात गदारोळ सुरूच राहिला. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी जाधव यांच्यावर निशाणा साधला. ही प्रथा अत्यंत वाईट आहे. जाधव यांची ही पहिलीच घटना नाही. विधानसभेच्या बाहेर नक्कल केली असली, तरी ती योग्य नाही. वारंवार असे केल्यास ते पराभूत होतील. सभागृहापेक्षा हे मोठे आहेत का? अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला शब्द देतो, हे रेकॉर्डवरून काढले नाही, तर त्यांच्यापेक्षा चांगल्या नकला मी करू शकतो, असे मुनगंटीवार म्हणाले. मोदींविषयी केलेल्या वक्तव्यावरून जाधव यांनी माफी मागण्याची मागणी विरोधकांनी शेवटपर्यंत लावून धरली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर भास्कर जाधव यांना सभागृहात बिनशर्त माफी मागावी लागली.

पंतप्रधानांची नक्कल करण्याचे जाधव यांचे वर्तन हे लज्जास्पदच असेच म्हणावे लागेल. त्यांनी चांगल्या कामासाठी नव्हे, तर गैरकामासाठी एकप्रकारे सभागृहाचा दुरुपयोग केला. भास्कर जाधव यांचे हे वर्तन आक्षेपार्ह आणि भंपकगिरीचे असेच म्हटले पाहिजे. पंतप्रधान जे बोललेच नाहीत, ते त्यांच्या तोंडी टाकण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आला. पंतप्रधान असे काही बोलल्याचा एकही व्हीडिओ कुणीही देऊ शकलेले नाही. पण ज्या प्रकारे अंगविक्षेप करून त्यांनी पंतप्रधानांची नक्कल केली, ते आक्षेपार्ह होते. विशेष म्हणजे आपल्या या वर्तनाचे ते लटके समर्थन करताना दिसले, ती गोष्ट तर त्याहूनही लाजिरवाणी अशी आहे. तरी एक बरे झाले फडणवीस यांच्या रुद्रावतारापुढे भास्कर जाधव यांना अखेर मान तुकवावी लागली. या सर्व नाट्यातून आता तरी त्यांनी काही बोध घ्यावा ही अपेक्षा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -