अॅडलेड (वृत्तसंस्था): अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ९ बाद ४७३ धावांवर घोषित केला. तिसऱ्या क्रमांकावरील मॅर्नस लॅबुशेनने (१०३ धावा) शतक पूर्ण केले तरी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनंतर हंगामी कर्णधार स्टीव्हन स्मिथला (९३ धावा) शतकाने हुलकावणी दिली. इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. दुसऱ्या दिवसअखेर शुक्रवारी खेळ थांबला तेव्हा पाहुण्यांनी २ बाद १७ धावा केल्या आहेत.
यजमानांनी २ बाद २२१ धावांवरून पुढे खेळताना ९ बाद ४७३ धावांची मजल मारली. दुसऱ्या दिवशी त्यांनी ७ विकेटच्या बदल्यात आणखी २५१ धावांची भर घातली. ९५ धावांवर नाबाद असलेल्या लॅबुशेनने कसोटीतील सहावे शतक झळकावले. त्याने ३०५ चेंडूंत १०३ धावांची खेळी केली. त्यात ८ चौकारांचा समावेश आहे. मात्र, तो लवकर बाद झाला. त्यानंतर हंगामी कर्णधार स्मिथने डावाची सूत्रे आपल्याकडे घेतली. माजी कर्णधाराला (९३ धावा) शतक पूर्ण करता आले नसले तरी लॅबुशेनसह तिसऱ्या विकेटसाठी ६५ धावा जोडल्यानंतर ट्रॅव्हिस हेडसह चौथ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. स्मिथला मधल्या फळीतील अलेक्स कॅरी (५१ धावा), मिचेल स्टार्क (नाबाद ३९ धावा) आणि अष्टपैलू मायकेल नेसेरची (३५ धावा) चांगली साथ लाभली.
स्मिथ आणि कॅरी यांच्यातील सहाव्या विकेटसाठीची ९१ धावांची भागीदारी ऑस्ट्रेलियाच्या डावातील दुसरी सर्वाधिक पार्टनरशीप ठरली. तळातील स्टार्क आणि नेसेरने आठव्या विकेटसाठी केलेली झटपट ५८ धावांची भागी यजमानांना साडेचारशेच्या घरात नेऊन गेली. त्यानंतर स्टार्कने रिचर्डसनसह २५ धावा जोडताना ऑस्ट्रेलियाला पावणेपाचशेची मजल मारून दिली. इंग्लंडच्या गोलंदाजांचे अपयश दुसऱ्या दिवशीही कायम राहिले. शुक्रवारी ऑस्ट्रेलियाने सात विकेट गमावल्या तरी झटपट धावाही केल्या. पाहुण्यांकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. पहिल्या दिवशी विकेट न घेणारा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने काल दोन फलंदाज बाद केले.
इंग्लंडच्या वाट्याला दुसऱ्या दिवशी जेमतेम नऊ षटके आली. त्यात त्यांनी हसीब हमीद (६ धावा) आणि रॉरी बर्न्स (४ धावा) या ओपनर्सना गमावले. दोघेही जेमतेम खाते उघडू शकले. स्टार्कने बर्न्स तसेच नेसेरने हमीदला बाद केले. अंधुक प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडची अवस्था २ बाद १७ धावा अशी झाली आहे. पहिल्या डावात ते अद्याप ४५६ धावांनी पिछाडीवर आहेत.
विक्रमी लॅबुशेन
यजमानांकडून लॅबुशेनने १०३ धावांची सयमी खेळी पेश केली. यासह गुलाबी चेंडू कसोटीत (डे-नाईट) तीन शतके झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला.
लॅबुशेननेआणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटसोबत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक कसोटी शतके ठोकणारा तो फलंदाज ठरला आहे. दोघांनीही प्रत्येकी सहा शतके झळकावली आहेत. श्रीलंकेचा सलामीवीर दिमुथ करुणारत्ने आणि भारताचा रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दोघांना प्रत्येकी पाच शतके लगावता आली आहेत.
लॅबुशेनने कसोटीत २००० धावांचा टप्पाही पार केला आहे. त्यासाठी ३४ डाव खेळावे लागले. सर्वात कमी डावांमध्ये दोन हजारी टप्पा गाठणाऱ्यांमध्ये महान फलंदाज डॉन ब्रॅडमन (२२), जॉर्ज हेडली (३२), हर्बर्ट सटक्लिफ (३३) आणि माइक हसी (३३) यांच्यानंतर लॅबुशेनने नंबर पटकावला आहे. सहावे कसोटी शतक ठोकताना लॅबुशेनने सर डॉन ब्रॅडमन यांचाही एक विक्रम मोडला आहे. लॅबुशेन त्याची २०वी कसोटी खेळत आहे. यात त्याने १७ वेळा ५० हून अधिक धावा केल्या. इतके सामने नावावर होते तेव्हा ब्रॅडमन यांनी १५वेळा अर्धशतकी मजल मारली होती.