मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत सध्या कोरोना नियंत्रणात असला तरीही ओमायक्रॉनच्या भीतीमुळे पालिकेने खबरदारी घेतली असून लसीकरण वाढवण्यास पालिकेने भर दिला आहे. यासाठी आता पालिकेने २४ तास लसीकरण सुरू केले आहे. मुंबईत कोरोना रुग्णसंख्या सध्या नियंत्रणात असली तरी ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होऊ नये यासाठी पालिकेने लसीकरण वेगाने करण्यास भर दिला आहे. यासाठी पालिकेने मुंबईतील सगळ्या २४ विभागांमध्ये २४ तास लसीकरण सुरू केले आहे.
जे नागरिक सकाळी लवकर नोकरीवर जातात किंवा दिवसभर त्यांना कामामुळे वेळ मिळत नाही अशा नागरिकांसाठी आता रात्री देखील लसीकरण सुरू केले आहे. मुंबईतील महापालिकेच्या २४ विभागांमध्ये प्रत्येकी एक कक्ष लसीकरणासाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. सोमवार पासून काही विभागांत रात्रीचे लसीकरण सुरू झाले असून मंगळवार पासून मुंबईतील संपूर्ण विभागामध्ये रात्रीचे लसीकरण सुरू होणार असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. तसेच एखादा विभाग मोठा असेल तर दोन लसीकरण कक्ष करण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान मुंबईत पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या १०० टक्के असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ८० टक्के आहे. त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत उरलेले २० टक्के लसीकरण पूर्ण करायचे उद्दिष्ट्य महापालिकेचे असल्याचेही काकाणी यांनी सांगितले आहे. तसेच ज्यांचा पहिला डोस झालेला आहे आणि दुसरा डोस घेण्याची तारीख उलटून गेली आहे अशांना पालिकेच्या वॉर रूमच्या माध्यमातून संपर्क केला असल्याचे काकाणी यांनी सांगितले.
माझे आस्थापन सुरक्षित आस्थापन मोहीम
माझे आस्थापन सुरक्षित आस्थापन हि मोहीम पालिका राबवणार असून हॉटेल, मॉल, कार्यालय येथे कायमस्वरूपी व कंत्राट देऊनही कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. लसीकरण पूर्ण झाले असल्यास त्यांना एक क्यू आर कोड देणार असून यामुळे लोकांना याची माहिती मिळणार असल्याचे समजते