Saturday, October 5, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखकर्णधारपदाचा प्रयाेग

कर्णधारपदाचा प्रयाेग

भारताच्या क्रिकेटमध्ये सध्या बदलाचे वारे आहेत. आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील एकदिवसीय (वनडे) मालिकेसाठी कर्णधारपदाची धुरा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माकडे सोपवण्यात आली. त्याच्याकडे यापूर्वी, टी-ट्वेन्टी प्रकारातील ‘कॅप्टन्सी’ आहे. पारंपरिक कसोटी क्रिकेटची धुरा विराट कोहलीकडे आहे. नव्या बदलांमुळे भारतीय क्रिकेटमध्ये आता एकाहून एक कर्णधार (मल्टिपल कॅप्टन्स) ही संकल्पना रूढ होऊ पाहत आहे. ही संकल्पना जागतिक क्रिकेटने यापूर्वीच अंगीकारली आहे. आशियाई देशांनीही असा प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे, हे विशेष.

१८४४पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली तरी त्यानंतर त्यात कालानुरूप बदल झाले. हे बदल क्रिकेटसह त्याच्याशी संलग्न प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळाले. वनडे आणि टी-ट्वेन्टी प्रकारांचा प्रवेश झाल्यानंतर क्रिकेटमधील स्पर्धा आणि रंजकता वाढली. नव्या रणनीती आणि झटपट निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमुळे कर्णधारांवरील ताण वाढला. कुशल नेतृत्व करताना वैयक्तिक खेळ उंचावण्याचे किंवा त्यात सातत्य राखण्याचे आव्हान प्रत्येक क्रिकेटपटूसमोर असते. कर्णधारांवरील वाढती जबाबदारी पाहता प्रत्येक प्रकारासाठी वेगवगळा कर्णधार निवडण्याचा (मल्टिपल कॅप्टन्स) विचार पुढे आला. ही संकल्पना ऑस्ट्रेलियन क्रिकेटने (सीए) पहिल्यांदा प्रत्यक्षात अमलात आणली. १९९७मध्ये ऑस्ट्रेलिया बोर्डाच्या निवड समितीने स्टीव्ह वॉ याची वनडे कर्णधारपदी निवड केली. तसेच त्याचा अनुभवी सहकारी मार्क टेलरकडे कसोटी संघाची धुरा सोपवली. त्यानंतर क्रिकेट खेळणाऱ्या अनेक देशांनी त्यांची री ओढली. आयपीएलच्या २००९ हंगामामध्ये संपूर्ण स्पर्धेत ‘मल्टिपल कॅप्टन्स’ निवडण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्णधारपदासाठी पात्र प्रत्येक क्रिकेटपटूला नेतृत्वगुण दाखवण्याची संधी मिळावी. तसेच प्रत्येक क्रिकेटपटू फ्रेश राहावा, असा प्रशिक्षक आणि संघव्यवस्थापनाचा त्यामागील उद्देश होता. हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.
सद्य:स्थितीत ऑस्ट्रेलियाचे कसोटी कर्णधारपद वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सकडे आहे. झटपट क्रिकेटची धुरा आरोन फिंचकडे आहे.

कसोटीमध्ये इंग्लंडचे नेतृत्व ज्यो रूट भूषवत आहे. वनडे, टी-ट्वेन्टीची ‘कॅप्टन्सी’ इयॉन मॉर्गनकडे आहे. पाकिस्तानकडे अझर अली आणि बाबर आझम तसेच वेस्ट इंडिजकडे जेसन होल्डर आणि कीरॉन पोलार्ड, दक्षिण आफ्रिकेकडे डीन एल्गर आणि क्विंटन डी कॉक असे कर्णधार आहेत. बांगलादेशने तर तिन्ही प्रकारांत वेगवेगळे कर्णधार निवडण्याचा प्रयोग केला आहे. २०१९ वनडे वर्ल्डकपमध्ये भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर एकाहून अधिक कर्णधार निवडीचा प्राधान्याने दिले. महेंद्रसिंग धोनी पायउतार झाल्यानंतर २०१७मध्ये भारताच्या क्रिकेटची सूत्रे विराट कोहलीकडे आली. त्याने जवळपास तिन्ही प्रकारांत संघाचे नेतृत्व केले. या कालावधीत चांगले सांघिक यश मिळाले तरी आयसीसी स्पर्धांत भारताला जेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) झालेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपनंतर या प्रकारातील कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. अनुभवी विराटकडे कसोटी प्रकारातील नेतृत्व कायम ठेवताना बीसीसीआयच्या निवड समितीने त्याच्याकडील वनडे कॅप्टन्सी रोहित शर्माकडे सोपवली.

कोहलीचा कर्णधारपदाचा काळ ही एक विलक्षण कथा आहे. सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने कोहलीला त्याच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या. कर्णधारपदासाठी सक्षम असल्याचे कळल्यावर विराटकडे झटपट क्रिकेटची जबाबदारी त्याच्यावर सोपवली. पुढील दोन वर्षांत कोहली चांगला कर्णधार बनला. मात्र, मनाप्रमाणे वागू लागला. त्यामुळे त्याच्या काही गोष्टी खटकू लागल्या. बीसीसीआयने त्याला ४८ तासांची मुदत दिली. मात्र कोहली ठाम राहिल्याने ४९व्या तासांत कोहलीकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले. २०२३ वनडे वर्ल्डकपर्यंत नवा कर्णधार नेमायचा असल्याने बीसीसीआय आणि राष्ट्रीय निवड समितीने कोहलीला कर्णधारपदावरून हटवले. टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या गटवार साखळीत भारत बाहेर पडला, त्या क्षणी कोहली याची कर्णधारपदावरून हकालपट्टी जवळपास निश्चित झाली होती; परंतु बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना गेल्या साडेचार वर्षांपासूनच्या संघनायकाला सन्माननीय मार्ग द्यायचा होता.

यूएईतील टी-ट्वेन्टी वर्ल्डकपनंतर काही महिन्यांतच मुंबईकर रोहितकडे झटपट क्रिकेटमधील आणखी एका प्रकाराची धुरा सोपवण्यात आली. २००७पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या रोहितला क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. वनडे क्रिकेटमध्ये १४ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने १६८ सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. हंगामी किंवा कामचलाऊ कर्णधार म्हणून रोहितने संघाला जिंकून दिले आहे. त्यातच आयपीएलमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनी पाच जेतेपदे पटकावली आहेत. हा अनुभव रोहितला देशाचे नेतृत्व करताना फायदेशीर ठरेल. कर्णधारपद हा काटेरी मुकुट आहे. अनेक महान क्रिकेटपटूंना सर्वोत्कृष्ट कॅप्टन बनता आले नाही.

महाराष्ट्रासह मुंबईच्या अनेक क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे कर्णधारपद भूषवले आहे. त्यांच्यात स्थान मिळाले तरी ३४ वर्षीय रोहितला ‘कॅप्टन’ म्हणून एक स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -