
कराची (वृत्तसंस्था) : पाकिस्तानमध्ये मंगळवारपासून (१३ डिसेंबर) खेळल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-ट्वेन्टी मालिकेवर कोरोनाचे सावट आहे. मालिकेला प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वी, एक दिवस आधी पाहुण्यांच्या तीन क्रिकेटपटूंना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटची लागण झाली आहे. त्यामुळे तिन्ही क्रिकेटपटू संपूर्ण मालिकेला मुकले आहेत.
वेस्ट इंडिज संघातील वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल, ऑलराउंडर रोस्टन चेस आणि मध्यमगती गोलंदाज काइल मेयर्स यांना १० दिवसांच्या आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. कॉट्रेल आणि मेयर्सचा टी-ट्वेन्टी संघात तर चेसचा वनडे संघातही समावेश आहे. कोरोनाची लागण झालेली आणखी एक व्यक्ती ही स्टाफ सदस्य आहे. इंडिज बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, संघातील सर्वांना लस देण्यात आली होती. तरी देखील त्यांना विषाणूची लागण झाली आहे. ज्या क्रिकेटपटूंचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे त्यापैकी कोणाला कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. संघातील अन्य क्रिकेटपटू आणि सदस्यांचा अहवाल निगेटिव्ह आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेमुळे पाकिस्तानमध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतत आहे. या दौऱ्यात पाहुणा संघ प्रत्येकी ३ सामन्यांची टी-ट्वेन्टी आणि वनडे मालिका खेळणार आहे. ही संपूर्ण मालिका कराचीमध्ये खेळवली जाणार आहे. वनडे मालिका ही क्रिकेट वर्ल्डकप सुपर लीगचा भाग आहे. टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या बाबर आझम आणि सहकाऱ्यांनी बांगलादेशवर ३-० अशी सहज मात करताना झटपट फॉरमॅटमधील सातत्य राखले आहे. वेस्ट इंडिज संघ नियमित कर्णधार, अष्टपैलू कीरॉन पोलार्डविना खेळत आहे. दुखापतीमुळे त्याने पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. पोलार्डच्या अनुपस्थितीत यष्टिरक्षक निकोलस पुरॅनकडे संघाची धुरा आहे. उभय संघांमध्ये कराचीत झालेल्या चारही सामन्यांत पाकिस्तानने वर्चस्व राखले आहे. त्यातील एक सामना २००८ तसेच उर्वरित तीन सामने २०१८मध्ये झालेत. मागील कामगिरीसह सध्याचा फॉर्म पाहता पाकिस्तानचे पारडे जड आहे.
काही दिवसांपूर्वी न्यूझीलंड आणि इंग्लंड संघांनी सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. वेस्ट इंडिज संघासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. वेस्ट इंडिज संघाच्या सुरक्षेसाठी कराची पोलीस विभागातील १३ वरिष्ठ अधिकारी, ३१५ बिगर सरकारी संघटना, ३ हजार ८२२ कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल, ५० महिला पोलीस, रॅपिड रिस्पॉन्स फोर्सचे ५०० जवान, ८८९ कमांडोसह ४६ डीएसपी यांची फौज असणार आहे.