सीमा दाते
गेल्या वर्षी कोरोनामुळे सर्व जग भीतीच्या सावटाखाली होते. रोजचे मृत्यू, रुग्णांची वाढती संख्या, रुग्णालयांची कमतरता या सगळ्याच समस्येतून अनेक देश गेले. महाराष्ट्रासह भारताची स्थिती काही वाईट नव्हती. विशेष म्हणजे मुंबईसारख्या शहरात जिथे लोकसंख्या जास्त आहे, त्यात अनेक जण चाळीत, झोपडीत राहतात. अशा ठिकाणी कोरोनाचा प्रसार झाला, तर तो रोखणं अशक्य होतं. पण मुंबई महापालिकेने ते रोखून दाखवले. सुरुवातीला धारावीसारख्या झोपडपट्टी परिसरात कोरोनाने शिरकाव केला. त्यानंतर वरळी कोळीवाड्यासारख्या परिसरात कोरोना पसरला. या दोन्ही ठिकाणी तो आटोक्यात आणणं एक आव्हानच होतं. मात्र पालिकेने धारावी पॅटर्न राबवत तिथून कोरोना कमी केला होता.
मुंबईतील स्थितीही भयानकच होती. २०२०चे वर्ष कोरोना सावटाखाली गेल्यानंतर २०२१मध्ये कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागला. दुसरी लाट आली, मात्र मुंबई महापालिकेने ती यशस्वीरीत्या थोपवलीसुद्धा. त्यानंतर हळूहळू राज्य सरकारने अनलॉकच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली. राज्यातील, मुंबईतील निर्बंध शिथिल केले गेले आणि जीवनमान सुरळीत सुरू झाले. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाट साधारण डिसेंबरला येणार, अशी शक्यता होती. मात्र तीही शक्यता मावळली की, काय असे वाटू लागले; कारण मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. त्यातच कोरोनामुळे शून्य मृत्यूची नोंदही दोन वेळा झाली. त्यामुळे तिसऱ्या लाटेची भीती कमी होत गेली. पण सध्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूच्या व्हेरिएंटमुळे कोरोना कायम राहतो की काय, अशी भीती आता मुंबई आणि प्रशासनात निर्माण झाली आहे.
सध्या जगभरात पुन्हा एकदा ओमायक्रॉन विषाणूमुळे भीती पसरली आहे. तज्ज्ञांच्या मते या विषाणूची बाधा झाल्यास सौम्य लक्षणे आढळतात. मात्र याचा प्रसार वेगाने होतो आणि त्यामुळेच पुन्हा एकदा राज्यात निर्बंध लागू होतात की काय, अशी भीती सर्वसामान्यांना आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले, ते अद्यापही मार्गावर आले नसताना पुन्हा निर्बंध कडक होण्याची भीती आहे. सध्या विचार करता महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव झालेला आहे, तर मुंबईतही सध्याच्या परिस्थितीत पाच रुग्ण ओमायक्रॉनचे आहेत. त्यामुळे ही रुग्णसंख्या आता कमी जरी असली तरी, ती वाढू नये म्हणून प्रशासनाला खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यातच लस घेतलेल्यांना ओमायक्रॉनचा किती प्रभाव होणार, हे देखील अजून स्पष्ट झालेले नाही. यामुळे प्रशासन देखील चिंतेत आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर जी स्थिती झाली होती, ती होऊ नये म्हणून आतापासून उपाययोजना करण महत्त्वाचं आहे.
सध्या धारावीत ओमायक्रॉनचा केवळ एक रुग्ण जरी आढळला असला तरी धारावीत ओमायक्रॉन वाढू नये म्हणून पालिकेने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. कोरोनाकाळात लागू केलेली त्रिसूत्री पालिका पुन्हा एकदा धारावीत राबवणार आहे. सगळ्यात आधी रुग्ण शोधणे, तपासणे, उपचार करणे, लसीकरण करणे हा फॉर्म्युला वापरणार असून चाचण्या आणि निर्जंतुकीकरणावर भर दिला जाणारा आहे.
धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असल्यामुळे भीती जास्त आहे. झोपडपट्ट्या, लहान घरं, जास्त लोकसंख्या, अरुंद गल्ली आणि सार्वजनिक शौचालयांचा वापर यामुळे धारावीत कोरोना वेगाने पसरला होता. तसेच धारावीत स्थानिक लोकांपेक्षा बाहेरून येऊन रोजगार करणारे लोकही जास्त आहेत. लहान-मोठे कारखाने, तेथील कामगार यामुळे कोरोना वेगाने धारावीबाहेरही जाऊ लागला. धारावीत रुग्णसंख्या वाढल्यानंतर ती तिथेच पालिकेने रोखली. मात्र आता ओमायक्रॉनच्या बाबतीतही पालिकेला हेच करावे लागणार आहे. लोकसंख्या पाहता त्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे; मात्र तरीही ओमायक्रॉन रुग्णसंख्या केवळ एकावरच थांबवावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जो एक रुग्ण ओमायक्रॉन बाधित आहे, त्याच्या निकटवासीयांच्या देखील तपासण्या केल्या होत्या आणि त्या निगेटिव्हही आल्या आहेत. त्यामुळे तूर्तास केवळ एक रुग्ण धारावीत ओमायक्रॉनचा आहे. मात्र तो वाढू नये म्हणून पालिकेने धारावी पॅटर्न २ वापरण्यास सुरुवात केली आहे.
संपूर्ण मुंबईचा विचार करता पालिकेने कोरोना चाचण्यांवर पालिकेने भर दिला आहे. आतापर्यंत ज्यांनी दुसरा डोस घेतलेला नाही, त्यांना तो देण्यात येत आहे. त्या व्यक्तीचा शोध घेणे, संपर्क करणं या माध्यमातून पालिका लसीकरण देखील वाढवत आहे. त्यामुळे ओमायक्रॉन ही जरी तिसऱ्या लाटेची शक्यता असली तरी पालिका मात्र ती रोखण्यासाठी तयारीत आहे. विशेष म्हणजे, सध्या मुंबईत ओमायक्रॉनचे केवळ पाच रुग्ण असले तरी, डिसेंबरमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण वाढतील, अशी शक्यता कमी आहे. पालिकेच्या चाचण्या, उपाययोजना पाहता तिसरी लाट येऊ न देणे, ही पालिकेची जबाबदारी ते पार पाडत आहेत. मात्र तरीही ओमायक्रॉनमुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.