
सिंधुदुर्ग: नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने आंबा-काजू पिकांची मोठी हानी झाली आहे. त्याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस राजेश माळवदे यांनी कणकवली तहसीलदार आर. जे पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास आणि शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागल्यास भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.
नोव्हेंबर अखेर ते डिसेंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम आंबा व काजू मोहरवर प्रचंड प्रमाणात झाला. अनेक शेतकऱ्यांनी बँक कर्ज उचल करून औषधे / किटकनाशके खरेदी केलेली होती. अवकाळी पावसाळ्यापूर्वी आंबा काजू कलमावर मोठ्या प्रमाणात फवारणी झालेली होती. मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाया गेला असून आर्थिक नुकसान झालेले आहे. अवकाळी पावसामुळे आलेला मोहर खराब झालेला असून त्याचा परिणाम आंबा काजू उत्पादनावर होणार आहे. शेतकऱ्यांनी स्वतःचा खर्च केलेला पैसा बैंक कर्जाद्वारे उभारलेला पैसा याद्वारे आर्थिक नुकसान होणार आहे.
शासकीय यंत्रणेमार्फत या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानीचे मूल्यमापन करण्यात यावे. जेणेकरून शेतकऱ्यांना शासकीय मदत पीक विमा संरक्षणाचा लाभ मिळविता येईल. त्यामुळे त्या दृष्टीने शासन स्तरावर पाठपुरावा करून तात्काळ कार्यवाही व्हावी, अशी मागणी भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस राजेश माळवदे यांनी कणकवली तहसीलदार आर. जे पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास आणि शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागल्यास भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.