मुंबई :क्षत्रिय बॅडमिंटन अकॅडमी आणि बीकेएलपी आयोजित जैन फाउंडेशन आणि क्षत्रिय बीकेएलपी बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य कुमार चौहानने पुरुष एकेरी आणि दुहेरी असा दुहेरी मुकुट मिळवला. १७ वर्षीय कशिका महाजनने पदार्पणात महिला एकेरीत बाजी मारली आणि साक्षात मराठीतला सुपरस्टार सचिन पिळगांवकर यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला.
अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत महिला गटात कशिकाने निधी दवे हिच्यावर २१-१०, २१-१७ असा दोन गेममध्ये विजय मिळवला. जवळपास अर्धा तास चाललेल्या फायनलमध्ये कशिकाने प्रतिस्पर्धीवर पूर्णपणे वर्चस्व राखले. उपांत्य फेरीत कशिकाने रहिना शेखवर मात केली. निधीने साक्षी बर्वेचा पराभव केला.
पुरुष एकेरी आणि दुहेरीत लक्ष्य कुमार चौहानने दबदबा राखला. पुरुष एकेरीच्या चुरशीच्या अंतिम फेरीत त्याने तेजस प्रभुदेसाईवर २१-१३, ११-२१, २१-१७ अशी मात केली. पहिला गेम सहज जिंकला तरी तेजसने सुरेख कमबॅक करताना दुसरा गेम जिंकत रंगत कायम ठेवली. तिसऱ्या आणि अंतिम गेममध्ये दोघांनीही सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन केले. मात्र, मोक्याच्या क्षणी आघाडी राखताना लक्ष्यने जेतेपदावर नाव कोरले. उपांत्य फेरीत लक्ष्यने निमेश मौर्य आणि तेजसने मन ग्रज याला हरवले.
पुरुष दुहेरीत लक्ष्यने सारांश गजभियेसह बाजी मारली. फायनलमध्ये लक्ष्य-सारांश जोडीने तेजस-निमेश जोडीवर २१-१६, २४-२२ असा विजय मिळवला. उपांत्य फेरीत लक्ष्य-सारांशने धीरेंद्र मौर्य आणि सुशांत शेट्टी तसेच तेजस-निमेश जोडीवर आदित्य स्वामी आणि पुरव सूर्यमूर्ती जोडीचा पराभव केला.