ऋतुचक्र बदलले; जबाबदार कोण?

Share

डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. आजवरच्या ऋतुचक्राप्रमाणे या कालावधीत हिवाळा असतो. मात्र, गेल्या चार दिवसांपासून राज्यात तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्याच्या जोडीला अंधुक प्रकाश आणि ढगाळ वातावरण आहे. ऋतुचक्र वेगाने बदलते आहे. यंदा पुण्यासह मुंबई या प्रमुख शहरांनी वर्षभर पाऊस अनुभवला आहे. दक्षिण भारतात वाढलेला पाऊस आणि त्याचवेळी युरोपीय देशांकडे निर्माण होणारी वातावरणीय स्थिती यांचा (वेस्टर्न डिस्टर्बन्सेस) एकत्रित परिणाम म्हणून मुंबईत डिसेंबरच्या प्रारंभीही पावसाने हजेरी लावली. वर्षभरातील पर्जन्यमानाचा विचार केल्यास २०२१ वर्षाची सुरुवात पावसाने झाली. ऋतू विभागणीनुसार, मुंबईकर गुलाबी थंडीची प्रतीक्षा करत असताना ८ जानेवारीला सकाळीच पावसाने हजेरी लावली. पुढील दोन दिवसही पाऊस पडला. पुढे मुंबई उपनगरात १९ फेब्रुवारी, त्यानंतर मार्च, एप्रिलमध्येही हलक्या सरी पडल्या. मे महिन्यात तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई शहर व उपनगरांत अनेक ठिकाणी पाऊस पडला. त्यामुळे यंदा मुख्य पावसाळा म्हणजे मोसमी पाऊससुरू होण्यापूर्वीच मुंबईत अडीचशे मिलिमीटरहून अधिकपाऊस झाला होता.

 मान्सून काळात दमदार पाऊस अपेक्षित असतो. त्याप्रमाणे वरूणराजाची बरसात झाली. ऑक्टोबरमध्ये मोसमी पाऊस परतला. मात्र, त्यानंतरही पावसाने उसंत घेतलेली नाही. प्रामुख्याने नैऋत्य मोसमी पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीत असतो; परंतु युरोपीय देशांकडे निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यांचा परिणाम भारतातील काही भागांवरही होतो. युरोपीय देशांमध्ये निर्माण होणारी ही वातावरणीय स्थिती ऑक्टोबर ते एप्रिल-मे या कालावधीत अधिक सक्रिय असते. या स्थितीचा परिणाम प्रामुख्याने उत्तर भारतावर होतो. काही वेळा मध्य भारतावरही युरोपीय वाऱ्यांचा परिणाम होत असल्याने सप्टेंबरनंतर आणि जूनच्या आधीही मुंबईत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसतात. नैऋत्य मोसमी पावसाच्या कालावधीत दक्षिण भारतात तुलनेने पाऊस कमी असतो. याउलट मुंबईचा पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात आग्नेय मोसमी पाऊस दक्षिण भारतात अधिक सक्रिय असतो. बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे अरबी समुद्राकडे सरकतात. हे पट्टे आर्द्रता घेऊन येतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पाऊस पडतो.

निसर्गात ऋतूनिहाय फळ, फुले आणि भाजीपाला उपलब्ध होत असतात. यामुळे त्या-त्या मोसमात त्याचा आस्वाद घेण्याची मजा औरच असते. याप्रमाणेच ऋतूनिहाय फुलणाऱ्या फुलांनाही तेवढेच महत्त्व आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून वातावरणात झालेल्या बदलाने प्रत्येक ऋतू जवळपास एक ते दीड महिने उशिराने येत असल्याचे चित्र आहे. याचे उदाहरण म्हणजे साधारणत: जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान पडणारा पाऊस आता वेळेत येत नाही. शिवाय हिवाळ्यातील थंडीही सुरू होण्याच्या महिन्यात बदल झाला आहे. साधारणत: हिवाळा हा ऋतू लीली, शेवंती, कॅलेंडूला, गुलाब, झिनिया यांसारख्या फुलांचा फुलण्याचा काळ असतो. मात्र, गेल्या दोन वर्षांत थंडीची चाहूल जरा उशिराच लागत असल्याने या झाडांना कळ्या येऊनही त्या फुलत नसल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडणारी थंडी डिसेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यात सुरू झाल्याने गार्डनमध्ये असलेल्या या फुलांच्या झाडांना अद्याप फुलेच आली नाहीत. ऋतुचक्रातील बदल हीच ग्लोबल वॉर्मिंगची खरी सुरुवात आहे. कोणताही विचार आणि नियोजन न करता होत असलेले नागरीकरण अवकाळी किंवा बिगर मोसमी पावसाला कारणीभूत ठरले आहे. शहरे वसवण्याच्या नावाखाली निसर्गाचा तोल बिघडविण्याचे काम माणसाने हाती घेतले, त्याला आता शेकडो वर्षे होऊन गेली आहेत. पण गेल्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आणि या शतकाच्या प्रारंभी मनुष्य जातीने उन्मादात वावरून निसर्गाचा तोल बिघडविण्याचेच नव्हे, तर निसर्गालाच बिघडविण्याचे काम हाती घेतले आहे. नदी, नाले, टेकड्या, झाडे, हवा, पाणी या सर्व गोष्टींचा आपल्या मनासारखा वापर करण्याची स्पर्धाच या शहरांमध्ये लागली आहे. मनमुराद जगण्यासाठी समोर असलेली प्रत्येक गोष्ट ओरबाडून घेण्याच्या वृत्तीने आता टोक गाठले आहे. त्याचेच परिणाम आपल्या सगळ्यांना आता थेट जाणवू लागले आहेत.

पूर्वी आठ जूनला पाऊस यायचा आणि आज्ञाधारक मुलासारखा सप्टेंबरअखेर पुरेसे पाणी देऊन जायचा. ऑक्टोबरमध्ये उकाडा वाटून नोव्हेंबरमध्ये छान थंडी पडायची. पण आता हे चित्र वेगाने बदलले आहे. आता पाऊस महिनाभर रेंगाळत येत नाही, तो कधी तरी एक-दोन दिवस येतो. उपकार एवढेच की, या दोन दिवसांमध्ये तो आपले काम पूर्ण करतो. रागावल्यानंतरही तो कर्तव्यात चुकत नाही. पुरेसे माप
नादान मानवाच्या कल्याणासाठी त्याच्या पदरात टाकतो. पण आता माणूस इतका उन्मत्त झाला आहे की, त्याला या उपकाराची जाण राहिलेली नाही. त्याच्या येण्यामध्ये आणि वाहण्यामध्ये अडथळे उभे करण्याचे काम त्याने हाती घेतले आहे. खरा धोका तोच आहे. सवयीनुसार माणूस बेफिकिरीनेच वागत राहील, कारण स्वत:ला किंवा जवळच्या व्यक्तीला फटका बसत नाही तोपर्यंत त्याची संवेदना जागृत होणार नाही. हे ऋतुचक्र बिघडविण्यासाठीच तो धडपड करील आणि त्यातूनच स्वतःचा नाश ओढवून घेईल. आपल्या ऱ्हासासाठी तो स्वतः जबाबदार असेल; नाव मात्र तो निसर्गाला ठेवेल इतकेच.

Recent Posts

नाल्यातून काढलेला गाळ ४८ तासांमध्ये उचललाच पाहिजे, भूषण गगराणी यांचे निर्देश

मुंबई : छोट्या व मोठ्या नाल्यांचे सुयोग्य नियोजन करुन खोलीकरण करावे, नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८…

2 minutes ago

ज्यांना काश्मीरला जायचं आहे त्यांनी संपर्क साधावा, मनसे नेते संदीप देशपांडे यांचे काश्मीरला जाण्याचे पर्यटकांना आवाहन

मुंबई : “ज्यांना काश्मीरला जायचं आहे, त्यांनी संपर्क साधावा. काश्मीरला जाणाच्या सहलीची सुरुवात आम्ही आमच्यापासून…

48 minutes ago

श्रवण दोष बाधित बालक: जागरूकता आणि उपाययोजना

डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…

6 hours ago

मानसिकता समजून घ्यावी लागेल!

रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…

7 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २५ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…

7 hours ago

पहलगामचा हिशोब भारत चुकता करणार!

काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…

7 hours ago