Sunday, April 27, 2025
Homeमहत्वाची बातमीडोंबिवलीत सापडला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण

डोंबिवलीत सापडला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण

मुंबई : ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण डोंबवलीमध्ये सापडल्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ निर्माण झाली आहे. हा ३३ वर्षीय तरुण दक्षिण आफ्रीकेतून दुबईमार्गे मुंबईत २४ नोव्हेंबरला आला.

ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण भारतात कर्नाटकात पहिल्यांदा सापडला. कर्नाटकात दोन जणांना ओमायक्रॉनची लागण झाली होती. त्यापाठोपाठ गुजरातमध्येदेखील एक जण ओमायक्रॉनबाधित झाला होता. या तीन जणांना लागोपाठ ओमायक्रॉनची लागण झाल्यामुळे महाराष्ट्राच्या वेशीपर्यंत तो येऊन ठेपला होता… त्यामुळे आधीच मुंबईकर त्रस्त होते. आणि अखेर मुंबईतही ओमायक्रॉनचा रुग्ण सापडल्यामुळे महाराष्ट्र आणि मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे २४ नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. या प्रवाशाला सौम्य ताप आला तथापि इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहे.

या रुग्णाच्या संपर्कात आलेले सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळले आहेत. याशिवाय या तरूणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्या विमान प्रवासातील २५ सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असून यापैकी सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळलेले आहेत. या शिवाय आणखी निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.

या दरम्यान झांबिया देशातून पुणे येथे आलेल्या ६० वर्षीय पुरुषाच्या जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून प्राप्त झाला असून या रुग्णामध्ये ओमायक्रॉन आढळलेला नाही तथापी डेल्टा सबलिनिएज विषाणू आढळून आलेला आहे.

दरम्यान, विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून याबाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करुन भारतात आले आहेत त्यांनीही आपल्या बाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -