दुसरी कसोटी : एजाझच्या विश्वविक्रमावर फेरले पाणी;
भारताने ‘फॉलोऑन’ लादला नाही, एकूण आघाडी ३३२ धावांची
मुंबई(प्रतिनिधी): वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस गोलंदाजांच्या नावे राहिला. न्यूझीलंडचा डावखुरा स्पिनर एजाझ पटेलने भारताच्या १० विकेट घेऊन ऐतिहासिक कामगिरी केली. मात्र, फलंदाजांनी काही तासांतच त्याच्या विश्वविक्रमावर पाणी फेरले. भारताच्या गोलंदाजांनी अचूक आणि प्रभावी मारा करताना पाहुण्यांचा पहिला डाव ६२ धावांवर संपुष्टात आणला. मात्र, यजमानांनी प्रतिस्पर्ध्यांवर ‘फॉलोऑन’ लादला नाही. दुसऱ्या दिवसअखेर, शनिवारी दुसऱ्या डावात बिनबाद ६९ धावा करताना एकूण आघाडी ३३२ धावांवर नेली.
वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑफस्पिनर आर. अश्विनच्या भेदक गोलंदाजीच्या माऱ्यासमोर पाहुणा संघ अक्षरशः ढेपाळला. त्यांचा डाव २८.१ षटके चालला. किवींकडून केवळ काइल जॅमिसनला (१८ धावा) दोन आकडी धावा करता आल्या. सिराजने भन्नाट गोलंदाजी करत कर्णधार टॉम लॅथम (१०), विल यंग (४) आणि रॉस टेलरला (१) झटपट बाद करताना प्रतिस्पर्ध्यांना हादरवले. त्यानंतर डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने डॅरिल मिचेलला (८) पायचीत पकडले. विराटने रवीचंद्रन अश्विनकडे चेंडू सोपवला. त्याने हेन्री निकोल्सची (७) दांडी गुल केली. अवघ्या ३१ धावांत न्यूझीलंडचे ५ फलंदाज बाद झाले. त्यानंतर न्यूझीलंडचे इतर फलंदाज बाद करण्यात भारताने जास्त वेळ गमावला नाही. अवघ्या ६२ धावांत न्यूझीलंडचा पहिला डाव संपुष्टात आला. भारताकडून रवीचंद्रन अश्विनने ८ धावांत ४ विकेट मिळाल्या. मोहम्मद सिराजने ३ तसेच अक्षर पटेलने २ विकेट घेतले. जयंत यादवला एक विकेट मिळाली.
सर्वात कमी धावसंख्या करण्याच्या न्यूझीलंडच्या या ‘लाजिरवाण्या’ विक्रमाच्या यादीत सर्वात पहिल्या क्रमांकावर ऑकलंड येथील इंग्लडचा सामना आहे. १९५५ मध्ये ऑकलंड येथे इंग्लंडविरुद्ध खेळताना न्यूझीलंडचा संघ २६ धावा करून बाद झाला होता. या यादीत दुसऱ्या क्रमांकावरची धावसंख्या ४२ आहे. १९४६ मध्ये वेलिंग्टनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांना पन्नाशीच्या आत बाद व्हावे लागले. न्यूझीलंडची तिसऱ्या क्रमांकावरील नीचांकी धावसंख्या दक्षिण अफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटीतील आहे. २०१३ मध्येझालेल्या सामन्यात पाहुणा संघ ४५ धावसंख्येवर बाद झाला.
शनिवारी सकाळी दुसऱ्या नव्या चेंडूवर भारताने दोन विकेट झटपट गमावल्या. मात्र, नाबाद सलामीवीर मयांक अगरवालने अष्टपैलू अक्षर पटेलच्या साथीने २८ षटके खेळून काढली. त्यामुळे पहिले सत्र यजमानांच्या नावे राहिले. ४ बाद २२१वरून पुढे खेळताना भारताने दिवसातील दुसऱ्या षटकात वृद्धिमान साहासह अष्टपैलू आर. अश्विनला गमावले. दोन्ही विकेट फिरकीपटू एजाझ पटेलने घेतल्या. त्याने साहाला पायचीत केले. यजमानांचा यष्टिरक्षक, फलंदाज आधीच्या धावसंख्येत केवळ दोन धावांची भर घालू शकला. साहाने ६२ चेंडूंत २७ धावा केल्या. त्यात ३ चौकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. साहा बाद झाल्याने मयांक आणि त्याच्यातील पाचव्या विकेटसाठीची ६४ धावांची भागीदारी संपुष्टात आली. कानपूर कसोटीत फलंदाजीत महत्त्वपूर्ण योगदान देणारा अष्टपैलू अश्विनकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, पुढच्याच चेंडूवर एजाझने त्याला बोल्ड केले. अश्विनला खातेही उघडता आले नाही. दोन चेंडूंवर दोन विकेट पडल्याने यजमानांचा डाव लंचआधी संपवू, असे न्यूझीलंडला वाटत होते. मात्र, मयांकने अक्षर पटेलसह सातव्या विकेटसाठी ६७ धावा जोडताना भारताला तीनशेच्या घरात नेले. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा भारताच्या ६ बाद २८६ धावा झाल्या होत्या. त्यावेळी मयांक अगरवाल १४६ आणि अक्षर पटेल ३२ धावांवर खेळत होता.
उपाहारानंतर भारताचा डाव १०९.५ षटकांत ३२५ धावांमध्ये संपला. यजमानांच्या उर्वरित ४ विकेट ४१ धावांमध्ये पडल्या. मयांकने लंचनंतर दीडशतक पूर्ण केले. मात्र, दुसऱ्याच ओव्हरमध्ये एजाझने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अगरवालच्या ३११ चेंडूंतील १५० धावांच्या खेळीत १७ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. अक्षर पटेलने ५२ धावांची खेळी करताना संघाला सव्वातीनशे धावांपर्यंत पोहोचवण्यात खारीचा वाटा उचलला. न्यूझीलंडकडून डावखुरा फिरकीपटू एजाझ पटेलने सर्वच्या सर्व १० विकेट घेण्याची करामत साधली. ४७.५-१२-११९-१० असा त्याचा अप्रतिम स्पेल राहिला. पहिल्या दिवशी सहा विकेट टिपणाऱ्या न्यूझीलंडच्या या स्पिनरने शनिवारी १२.५-०-३०-४ अशी किफायतशीर गोलंदाजी केली. एजाजने ४७.५ षटकात ११९ धावा देत १० विकेट घेतल्या. यात षटके ही निर्धाव होती. भारताचा सलामीवीर मयांक अग्रवाल ते अखेरचा फलंदाज मोहम्मद सिराजपर्यंत सर्वांना एकट्या एजाजने माघारी पाठवले. त्यापैकी ४ भारतीय फलंदाजांना शून्यावर बाद केले. यात चेतेश्वर पुजार, विराट कोहली, आर. अश्विन आणि उमेश यादवचा समावेश आहे.
शनिवार गोलंदाजांचा
दुसरा दिवस (शनिवार) हा गोलंदाजांच्या नावे राहिला. दिवसभरात १४ विकेट पडल्या. त्यात भारताच्या पहिल्या डावातील चार विकेटचा समावेश आहे. पहिल्या दिवशी सहा विकेटची नोंद झाली.
जन्माला आलो तिथे विश्वविक्रमी कामगिरी करण्याचे मोठे समाधान
जन्माला आलो तिथेच विश्वविक्रमी कामगिरी करण्याचे मोठे समाधान आहे. मात्र, माझी कामगिरी पाहण्यासाठी वडील सध्या मुंबईत नाहीत, असे एजाझ पटेलने म्हटले आहे. डावात सर्वच्या सर्व दहा विकेट घेण्याची करामत इंग्लंडच्या जिम लेकर यांनी १९५६मध्ये केली होती. योगायोग म्हणजे कौंटी क्रिकेटमध्ये लेकर हे यॉर्कशायरचे प्रतिनिधित्व करतो. त्यांच्यासारखाच विक्रम करणारा एजाझ हा त्याच कौंटी संघातून खेळतो. याबाबत विचारले असता, हा निव्वळ योगायोग आहे. मात्र, लेकर यांच्यासह भारताचे महान लेगस्पिनर कुंबळे यांच्या पंक्तीत बसायचा मान मिळणे जास्त महत्त्वाचे असल्याची भावना एजाझने व्यक्त केली.
भारताविरुद्ध ‘पर्फेक्ट टेन’ कामगिरी करणारा पहिला गोलंदाज
१९५६मध्ये इंग्लंडचे माजी फिरकीपटू लेकर यांनी (५१.२-२३-५३-१०) ओल्ड ट्रॅफर्डवर ऑस्टेलियाविरुद्ध तसेच १९९९मध्ये भारताचे माजी कर्णधार, लेगस्पिनर अनिल कुंबळे यांनी (२६.३-९-७४-१०) पाकिस्तानविरुद्ध एका डावात सर्वच्या सर्व विकेट टिपल्या. मात्र, दोघांनीही घरच्या मैदानावर (होमग्राउंड) ही करामत साधली. मात्र, परदेशात तसेच भारताविरुद्ध अशी कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज आहे. न्यूझीलंडकडून माजी वेगवान गोलंदाज रिचर्ड हेडलीने एका डावात सर्वाधिक ९ विकेट घेतल्या होते. हा विक्रमसुद्धा एजाझने मोडीत काढला.
दुर्मीळ विक्रमानंतर माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी एजाझचे अभिनंदन केले आहे. एजाझ तुझे ‘पर्फेक्ट टेन क्लब’मध्ये स्वागत आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी अशी कामगिरी साध्य करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, असे त्यांनी त्याच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.