Tuesday, July 23, 2024
Homeमहत्वाची बातमीगेमचेंजर्स वॉर्ड ठरवणार मुंबईचे सत्ताधारी

गेमचेंजर्स वॉर्ड ठरवणार मुंबईचे सत्ताधारी

सुवर्णा दुसाने

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असा लौकिक असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. चाळीस हजार कोटी रुपयांचे बजेट असलेल्या मुंबई महापालिकेची सूत्रे आपल्या हाती असावीत, अशी सगळ्याच पक्षांची इच्छा असते. १९९७ साली मुंबई महापालिकेची सत्ता काँग्रेसकडून शिवसेनेने खेचून घेतली आणि सलग २५ वर्षे मुंबईवर एकहाती सत्ता राबविली. शिवसेनेला राजकीय रसद पुरविण्याचे काम मुंबई महापालिकेने केले. त्यामुळे मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे संख्याबळ दिवसेंदिवस घटत असताना २०१७च्या निवडणुकीत भाजपने मोठी मुसंडी मारली. शिवसेना २८.२९ टक्के मते मिळवीत ८४ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष बनला, तर भाजप २७.३२ टक्के मते मिळवीत ८२ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचला. तरीही भाजपने विरोधी पक्षनेतेपद नाकारून शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला. राज्यातील युतीचे समीकरण बिघडू नये म्हणून कदाचित भाजपने एक पाऊल मागे घेतले असण्याची शक्यता आहे. मात्र भाजपचे ८२ जागा जिंकणे ही शिवसेनेसाठी धोक्याची घंटा मानली जाते.

सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलली. राजकीय मित्र विरोधात गेले, तर विरोधक मित्र बनून राज्यात आघाडीची सत्ता स्थापन झाली. राजकीय तडजोड म्हणून एक पाऊल मागे टाकत मुंबईत शिवसेनेला दिलेला पाठिंबा ही आपली चूक होती का, अशी अवस्था भाजपची होणे साहजिकच होते. शिवसेनेची सत्ता असलेली आणि एका राज्याएवढे बजेट असलेली मुंबई महापालिका आपल्या ताब्यात यावी, यासाठी भाजप मोर्चेबांधणी करताना दिसतो आहे. २०१७ सालच्या निवडणुकीत १०५ वॉर्ड्स हे अत्यंत कमी मतांच्या फरकाने जिंकले गेले आहेत. शून्य ते ५ टक्के मतांच्या फरकाने ५१ वॉर्ड्स, तर ५ ते १० टक्के मतांच्या फरकाने ५४ वॉर्डमध्ये विजय झाला आहे. या वॉर्डचे उमेदवार हे काठावर पास झालेले आहेत. म्हणजेच पराभूत उमेदवार अत्यंत कमी मतांनी हरलेले आहेत.

  •  वॉर्ड क्र. १९४ मध्ये शिवसेनेचा तरुण तडफदार चेहरा असलेले समाधान सरवणकर यांची शिवसेना बंडखोर महेश सावंत यांनी दमछाक केली. मात्र राजकारणाचं बाळकडू घरातच मिळालेल्या समाधान सरवणकर यांनी साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करीत अवघ्या २५० मतांच्या फरकाने विजयश्री खेचून आणली.
  •  तर वॉर्ड क्र. ७१मधून शिवसेनेचा हाडाचा कार्यकर्ता असलेल्या जितेंद्र जनावळे यांचा अवघ्या ५३४ मतांनी भाजपचे उमेदवार अविनाश मकवाने यांनी पराभव केला होता.
  •  वॉर्ड क्र. ७४ मधून भाजपच्या अनुभवी नगरसेविका उज्ज्वला मोडक या केवळ ४५८ मतांनी विजयी झाल्या होत्या. शिवसेनेच्या रचना सावंत यांनी त्यांना काटे की टक्कर दिली.
  •  वॉर्ड क्र. ८२ मधून काँग्रेसचे जगदीश आमीन हे केवळ ४० मतांनी विजयी झाले होते. भाजपच्या संतोष केळकर यांनी जगदीश आमीन यांना चांगलाच घाम फोडला होता.
  •  शिवसेनेचे महापौर राहिलेले विश्वनाथ महाडेश्वर अवघ्या ३४ मतांनी विजयी झाले होते. भाजपच्या कृष्णा पारकर यांनी महाडेश्वरांना जवळपास पराभवाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं होते.

शिवसेनेचे मंगेश सातमकर, काँग्रेसचे रवी राजा असे दिग्गज अल्पमतांनी निवडून आले. अत्यंत चुरशीची लढत झालेल्या आणि अनेक दिग्गजांना नाकीनऊ आणणारे १०५ वॉर्ड्स हे आगामी निवडणुकीत गेमचेंजर ठरू शकतात.  या वॉर्डमधील राजकीय परिस्थितीचा अभ्यास करून योग्य रणनीती आखली, तर हे वॉर्ड्स मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी निर्णायक ठरू शकतात. याची जाणीव सर्वच राजकीय पक्षांना आहे आणि त्यादृष्टीने त्यांची मोर्चे बांधणीही सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्याचे पडसाद पाहायला मिळतील, असे दिसते. नासा ग्लोबल मीडिया आणि श्री मीडिया रिसर्च प्रा. लि. यांनी संयुक्तपणे केलेल्या सर्व्हेनुसार मुंबईतील मतदारांचा कौल समोर आला आहे. त्यानुसार शिवसेना ३१ टक्के मते घेत ८५ जिंकू शकते, तर भाजप ३४ टक्के मते मिळवीत ९३ जागांवर विजयी होईल, असे दिसते. यावरून शिवसेनेला मागे टाकीत भाजप सर्वाधिक मोठा पक्ष ठरेल. मागच्या वेळी केवळ २ जागा पिछाडीवर असलेला भाजप ९३ जागांपर्यंत मजल मारताना दिसतो. मागील निवडणुकीत चुरशीची लढत झालेले मतदारसंघ भाजप आपल्याकडे खेचताना दिसत आहे.
शिवसेना व मनसे यांच्यात मराठी मतांची विभागणी झाल्याने त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. आगामी निवडणुकीत मनसे केवळ ४ जागांवर विजयी होईल, असं सर्वेक्षणात पुढे आलंय. मागाठाणे, चारकोप, वरळी आणि शिवडी विधानसभा मतदारसंघातील काही वॉर्ड्समध्ये मनसेचा प्रभाव आहे. मात्र मराठीबहुल विभागात मराठी मतांची शिवसेना आणि मनसे यांच्यात विभागणी होताना दिसते. त्याचा फटका शिवसेनेला बसून भाजपला फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीवर नाराज मतदारांची मते भाजपच्या पारड्यात पडू शकतात. साहजिकच मागील निवडणुकीत चुरशीची लढत झालेले १०५ वॉर्ड्स हे गेमचेंजर वॉर्ड आहेत. हे वॉर्ड कोणत्या पक्षाला साथ देतात त्यावर मुंबईची सत्ता कोणाच्या हाती जाईल हे ठरेल, एवढे मात्र नक्की.
(लेखिका नासा ग्लोबल मीडियाच्या संस्थापक आहेत)
nassaglobal21@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -