मुंबई (प्रतिनिधी) : देशात ‘ओमायक्रॉन’चे दोन रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या कर्नाटकात हे दोन रुग्ण सापडले आहेत. त्यात महाराष्ट्रात एकूण २८ ‘ओमायक्रॉन’ संशयित रुग्ण सापडल्याने ही डोकेदुखी आणखीनच वाढली आहे. त्यातील १० संशयित हे एकट्या मुंबईतील आहेत. ‘ओमायक्रॉन’ विषाणूच्या प्रकाराने जगामध्ये दहशत माजवली आहे. भारतात गुरुवारी ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आणि या विषाणूने अखेर देशात शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर देशभरातील आरोग्य यंत्रणा, सरकार सतर्क झाले असून, उपाययोजना केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे शेजारी राज्य असलेल्या कर्नाटकात हे दोन रुग्ण सापडल्याने राज्याची डोकेदुखी वाढली. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून शेकडो जण परदेशातून आले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत असून त्यांना क्वारंटाइन करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत ‘ओमायक्रॉन’चे २८ संशयित सापडले आहेत. त्यातील १० जण हे मुंबईतील आहेत, तर इतर उर्वरित शहरांतील आहेत. या २८ जणांपैकी २५ जण हे विदेशातून आलेले आहेत, तर इतर ३ जण हे त्यांच्या संपर्कातील असल्याची माहिती समजते. या सर्वांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांना ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झाला आहे किंवा नाही हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. पुढील आठवड्यात या चाचण्यांचे अहवाल येण्याची शक्यता आहे. मुंबईत अद्याप एकही ओमायक्रॉनचा संसर्ग झालेला रुग्ण सापडलेला नाही, असे मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. ज्या संशयितांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत, त्यांचे अहवाल लवकरच येतील, अशी शक्यताही व्यक्त केली.
हे सर्व जण गेल्या महिनाभराच्या कालावधीत विदेशातून महाराष्ट्रात आलेले आहेत. त्यातील २५ जण हे विदेशातून महाराष्ट्रातील विविध भागांत परतले असून, उर्वरित तीन जण हे या लोकांच्या संपर्कात आल्याने बाधित झाले आहेत. या सर्व रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.
गेल्या महिनाभराचा आढावा घेतला, तर मुंबईत विदेशातून परतलेल्यांची संख्या अडीच हजारांहून अधिक असल्याची माहिती आहे. हे सर्व प्रवासी हाय रिस्क देशांतून आलेले आहेत. स्थानिक प्रशासनाकडून अशा सर्व लोकांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांचा शोध सुरू आहे. यातील ८६१ जणांचा शोध लागला असून, त्यातील २५ जण हे कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. तर या २५ जणांपैकी काहींच्या संपर्कात आलेल्या तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, या तीन जणांनी विदेशात प्रवास केलेला नाही.