Saturday, October 5, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखनायर रुग्णालयातील हलगर्जीपणा

नायर रुग्णालयातील हलगर्जीपणा

देशाची आर्थिक राजधानी आणि जगातील अग्रगण्य शहर असलेल्या मुंबईतील सर्व सोयीसुविधा या अत्याधुनिक स्वरूपातील व यंत्रणाही अगदी तत्पर, सजग आणि संवेदनशील अशा असायलाच हव्यात. पण सध्याचे चित्र मात्र तसे दिसत नाही. या शहरावर जेव्हा एखादी नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती येते, अथवा संकट कोसळते तेव्हा या शहरातील सर्व शासकीय, प्रशासकीय यंत्रणांबरोबरच मुंबईकर नागरिक, समाजसेवी संस्था अशा सर्वांचीच कसोटी लागते. या कसोटीत काही वेळा या यंत्रणा उत्तम कामगिरी बजावून उत्तीर्ण ठरलेल्या दिसतात, तर काही सपशेल अपयशी झालेल्या आपण पाहतो.

गेल्या काही काळापासून म्हणजेच कोरोना महामारीच्या काळात मुंबईसह राज्यातील आरोग्य यंत्रणांचे खरे कसब पणाला लागलेले दिसले. कोरोना काळात उभारण्यात आलेली मोठ-मोठाली कोविड सेंटर्स, तपासणी केंद्र आणि व्यापक लसीकरणाची मोहीम हाती घेतल्यावर नागरिकांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यासाठी राज्य आणि मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा, आरोग्य सेवक, डॉक्टर्स, परिचारिका आदी सर्वांचाच कस लागला. हे सर्व करत असताना अनेकदा राजकीय इच्छाशक्तीचा अभाव किंवा अपरिपक्वपणा आणि परस्पर समन्वय साधण्यातले अपयश उघड झालेले दिसले. असे असताना राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी मात्र केंद्राने ठरवून दिलेल्या कामगिरीत आपण कसे यशस्वी ठरलो आहोत, हे दाखवून देण्यात व स्वत:चीच पाठ थोपटून घेण्यात मश्गूल असलेले दिसले, पण जेव्हा काही त्रुटी उघड झाल्या तेव्हा मात्र येथील सत्ताधारी आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी लगेच केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचे वारंवार दिसले. केंद्राकडून आम्हाला सापत्न वागणूक मिळत असल्याचा घोषा हे पक्ष आळीपाळीने लावताना दिसतात. मात्र आपणच अनेक बाबतीत कमी पडत आहोत व काही सुधारणा करणे गरजेचे आहे, ही बाब यांच्या कधी ध्यानी आलेली दिसत नाही. गेली ३० वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता शिवसेनेची आहे आणि मुंबईतील सर्वच अधोगतीला हाच पक्ष जबाबदार आहे, असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे.

मराठी माणसाची मुंबई असली तरी शिवसेना येथील नागरिकांची काळजी घेण्यात, त्यांना पुरेशा सोयी-सुविधा पुरविण्यात अपयशी ठरली आहे, असेच खेदाने म्हणावेसे वाटते. कारण पावसाळ्यात मुंबईची जी पराकोटीची दैन्यावस्था होते ती पाहिली की, ही बाब ध्यानी येते. हे एवढ्यापुरते मर्यादित नाही. मुंबईत अनेकदा दुर्घटना घडतात, तेव्हा त्यावर मात करताना मुंबई महापालिकेचे प्रशासन पूर्णत: अपयशी ठरलेले दिसते. मुंबईत आग लागण्याच्या घटना, तर अनेकदा घडतात. मुंबईच्या वरळी परिसरात मंगळवारी आगीची एक भयानक घटना घडली. वरळीतील बीबीडी चाळीत एका घरातील गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. सिलिंडरच्या स्फोटानंतर आगीचा भडका उडाला. त्यामुळे संपूर्ण घराला आग लागली. आगीची घटना कळताच तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात यशही आले. या स्फोटामुळे संपूर्ण चाळ हादरली व त्याच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या स्फोटात एका चार महिन्यांच्या बाळासह चारजण होरपळले असून या सर्व जखमींना तत्काळ मुंबई सेंट्रलच्या प्रमुख अशा नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, पण त्यांना जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले तेव्हा त्यांना लागलीच उपचार मिळू शकले नाहीत. त्या चिमुकल्यासह
सर्व होरपळलेले चारजण बराच वेळ विव्हळत डॉक्टरांची वाट पाहत असल्याचे एका व्हीडियोत दिसत आहे. हा व्हीडियो भाजपचे तरुण आणि संवेदनशील आमदार नितेश राणे यांनी शेअर केला असून या दयनीय अवस्थेबद्दल सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे.
जेव्हा एखाद्या रुग्णाला उपचारांसाठी दाखल करण्यासाठी आणले जाते तेव्हा त्याला लागलीच संबंधित वॉर्डमध्ये हलवून, तेथे डॉक्टरांना पाचारण करून लगोलग उपचार सुरू होणे आवश्यक आहे. येथे मात्र तसे झालेले दिसत नाही. कारण सिलिंडर स्फोटात जखमी झालेले ते तान्हं बाळ रडत, किंचाळत तेथे विव्हळत होते, पण कोणी डाॅक्टर किंवा नर्स तेथे हजर होऊन तत्काळ उपचार सुरू करण्यास उपलब्ध नसल्याचे दिसत आहे. दुर्दैवाने या बाळाचाही या वेदनेतच अंत झाला. मुंबईकरांवर आम्ही मोफत उपचार करतो, अशी शेखी मिरविणाऱ्या शिवसेनेचे रुग्णालयांकडे साफ दुर्लक्ष झालेले दिसते. कारण येथील यंत्रणांवर कोणाचाही धाक किंवा लक्ष असलेले दिसत नाही. नाही तर, अशा गोष्टी सतत घडल्या नसत्या. जगात वरच्या क्रमांकाची आणि आशिया खंडात क्रमांक एकची असलेली ही मुंबई महानगरपालिका आता गैरव्यवहार, गैरव्यवस्थान आणि गैरप्रकार यांनी पुरती पोखरलेली दिसत आहे. या सर्व दुर्दशेला शिवसेनाच कारणीभूत आहे, त्यामुळे येत्या निवडणुकीत मुंबईकर जनता सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात शिरलेली सत्तेची मस्ती उतरविल्याशिवाय राहणार नाही, असेच दिसत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -