सुनील सकपाळ
कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर झालेली न्यूझीलंडविरुद्धची पहिली कसोटी अनिर्णीत राहिली. पाहुण्यांच्या तळातील फलंदाजांनी खेळपट्टीवर थांबण्याचे धाडस दाखवल्याने भारताची विजयाची संधी हुकली. मात्र, शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्याने कसोटी क्रिकेटची रंजकता कायम राखली आहे.
या मालिकेपूर्वी भारताने सप्टेंबरमध्ये इंग्लंड दौरा केला होता. त्यात पाचपैकी चार सामने खेळले गेले. त्यात भारताने २-१ अशी बाजी मारली. ओव्हलमध्ये झालेली चौथी कसोटी पाचव्या दिवसापर्यंत चालली तरी लीड्स कसोटी सामना चार दिवसांत संपला. लॉर्ड्स कसोटीचा निकालही लवकर लागला. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेआधी साउथम्पटनमध्ये झालेल्या पहिल्या-वहिल्या आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताला न्यूझीलंडकडून पराभूत व्हावे लागले. पावसामुळे जवळपास सव्वा दिवस वाया गेला तरी भारताची फलंदाजी ढेपाळल्याचा फायदा प्रतिस्पर्धी किवी संघाने उठवला. विद्यमान मालिकेपूर्वी, भारताने मार्च-एप्रिलमध्ये इंग्लिश संघाशी दोन हात केले होते. चार सामन्यांच्या मालिकेत यजमानांनी ३-१ असा विजय मिळवला. या मालिकेतील सर्व सामने निकाली ठरले तरी अहमदाबादमध्ये झालेली चौथी आणि अंतिम कसोटी केवळ तीन दिवसांत संपली. याच मैदानावरील तिसरी कसोटी दोन दिवसांत आटोपली. मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईत झाले. इंग्लंडने विजयी सुरुवात केली तरी दुसरी कसोटी चार दिवसांत जिंकताना भारताने मालिकेत दमदार पुनरागमन केले. इथे इतकेच सांगायचे आहे की, भारताच्या देश-परदेशातील मागील नऊ कसोटी सामन्यांतील निकालांचा आढावा घेतल्यास आठ सामने निकाली ठरले. ही आनंदाची बाब असली तरी त्यातील सहा सामने तीन ते चार दिवसांत संपले. पारंपरिक कसोटी क्रिकेटसाठी हे निश्चितच आशादायी नाही.
कसोटी क्रिकेटमधील रंगत कायम राखण्यासाठी प्रत्येक सामना किमान शेवटच्या दिवसापर्यंत खेळला गेला पाहिजे. त्यानंतर जो काही निकाल लागेल तो सर्वमान्य व्हावा. पारंपरिक प्रकारातील रंजकता कायम राखण्याच्या दृष्टीने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कानपूर कसोटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. या सामन्याचा प्रत्येक दिवसागणिक विचार केल्यास पहिला दिवस भारताच्या नावे राहिला. दुसरा दिवस पाहुण्या संघाच्या वाट्याला गेला. तिसऱ्या दिवशी यजमानांच्या फिरकीपटूंनी प्रतिस्पर्धी फलंदाजांना लवकर बाद करताना भारताला ४९ धावांची छोटेखानी; परंतु महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. दोन डाव संपायला तीन दिवस लागल्याने ग्रीन पार्कवरील कसोटी अनिर्णितावस्थेकडे झुकली होती. मात्र, चौथा दिवस खेळून काढताना भारताने एकूण आघाडी २८३ धावांवर नेत किवींसमोर २८४ धावांचे विजयासाठीचे लक्ष्य ठेवले. चौथ्या दिवशीच्या पाच आणि शेवटच्या दिवसांतील ९० षटकांत जवळपास तीनशे धावांचा पाठलाग सोपा नाही. त्यातच चौथ्या दिवशी सलामी जोडी फुटल्याने अख्खा दिवस खेळून काढताना सामना अनिर्णीत राखण्याला न्यूझीलंडने प्राधान्य दिले.
कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक सेशन्स (सत्र) महत्त्वाचा असतो. कुठलाही संघ संपूर्ण दिवसाचा विचार न करताना प्रत्येक सेशन्सवर पुढील व्यूहरचना रचतो. पहिल्या सत्रात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी विकेट न फेकल्याने सामना ड्रॉ होणार, असे वाटत होते. मात्र, उपाहारानंतर भारताच्या गोलंदाजांनी तीन विकेट काढल्या आणि सामन्यात रंगत निर्माण झाली. किवी फलंदाजांसमोर शेवटचे आणि अंतिम सत्र खेळून काढण्याचे आव्हान होते. भारताला जिंकण्यासाठी आणखी सहा विकेटची गरज होती. ऑफस्पिनर आर. अश्विन, डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने मधली फळी कापून काढताना संघाला विजयासमीप आणून ठेवले. दुसरीकडे, न्यूझीलंडचे तळातील फलंदाज एकेक चेंडू खेळून काढत पराभव टाळण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत होते. त्यात सरतेशेवटी पाहुणे सरस ठरले.
कसोटी अनिर्णीत राखण्याचे सर्वाधिक क्रेडिट न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथम, नाईट वॉचमन विल्यम सॉमरविले, कर्णधार केन विल्यमसन, तळातील रचिन रवींद्र तसेच रॉस टेलर, टॉम ब्लंडेल, काइल जॅमिसन आणि अजाझ पटेल यांना जाते. यात गोलंदाज अधिक आहेत. प्रत्येकाने खेळपट्टीवर अधिकाधिक वेळ थांबताना भारताचे मालिकेत विजयी आघाडी घेण्याचे मनसुबे उधळून लावले. अश्विन, जडेजा आणि अक्षर पटेल हे फिरकी त्रिकूटही कौतुकास पात्र आहे. त्यांनी अचूक आणि प्रभावी मारा करताना विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, त्यांना नशिबाची साथ लाभली नाही. भारताने दुसरा डाव लवकर सोडला असता तर…, पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात एखादी विकेट मिळाली असती तर…, स्पिनर्सना क्षेत्ररक्षकांची योग्य साथ मिळाली असती तर…. अशा अनेकाविध कारणांची चर्चा सुरू आहे. मात्र, निकाल लागला नसला तरी सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगल्याने कसोटी क्रिकेट जिंकले. पहिल्या कसोटीसाठी स्पोर्टिंग पिच बनवल्याबद्दल भारताचे नवनियुक्त प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ग्राउंड्समन यांना (खेळपट्टी तयार करणारे) रोख बक्षीस दिले. यातच सर्व काही आले. एका हेड कोचने ग्राउंड्समनचे केलेले कौतुक कसोटी क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला भावले. भविष्यातील प्रत्येक सामना असाच रंगतदार झाला, तर झटपट क्रिकेटमुळे झाकोळलेल्या पारंपरिक क्रिकेट प्रकाराची लोकप्रियता टिकून राहण्यास मदत होईल.