शिबानी जोशी
डोंबिवलीला मध्यमवर्गीय, पांढरपेशी लोकसंख्या खूप आहे. अनेक संघ स्वयंसेवक तिथं अनेक वर्षं कार्यरत आहेत. त्यापैकीच मामा देवस्थळी आणि सुरेश नारायण नाखरे समाजकार्य करत होते. दोघांनीही आणीबाणीच्या काळात सत्याग्रहात सहभाग घेतला होता. नाखरे सरांची विवेकानंद केंद्राचे जीवनव्रती म्हणून निवड झाली होती; परंतु काही कौटुंबिक कारणांमुळे त्यांना जाता आलं नाही. त्यामुळे त्यांनी अशी प्रतिज्ञाच केली होती की, आपण आयुष्यभर शिक्षकी पेशाचा जो वसा घेतला आहे, त्या आपल्या नियमित कामामधूनच कार्यकर्ते घडवायचे. त्याची सुरुवात कशी करायची? तर, अक्षरशः ग्राहक संघाच्या छोट्याशा गोडवूनमध्ये एक कपाट, एक सतरजी आणि काही पुस्तकं घेऊन सर्वात प्रथम इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुरू केलं. त्याचं कारण असं होतं की, त्या वेळी डोंबिवलीसारख्या मध्यमवर्गीयांच्या उपनगरांमध्ये इंजिनीरिंगला जाणाऱ्या मुलांची संख्या खूप मोठी होती; परंतु त्या अभ्यासक्रमाची पुस्तकं महागडी असल्याने ती सर्वांना विकत घ्यायला परवडत नसे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं इंजिनीअरिंगचं शिक्षण झालं आहे, त्यांनी ती वाचनालयाला दान करायची किंवा काही सेकंड हॅन्ड पुस्तकं गोळा करायची आणि इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी उपलब्ध करून द्यायची, अशा कामाला विवेकानंद सेवा मंडळाने सुरुवात झाली.
विवेकानंद सेवा मंडळ या संस्थेची १९९१ सालच्या ऑक्टोबर महिन्यात दसऱ्याला औपचारिक स्थापना झाली. त्यावेळचा एक अनुभव सध्या संस्थेचा अध्यक्ष असलेला केतन बोंद्रे आवर्जून सांगतो. तो म्हणाला की, १९९१ साली तो डिप्लोमा इंजिनीरिंगचा अभ्यास करत होता. एक दिवस मामांनी त्याला रस्त्यात पकडलं आणि सायकल थांबून विचारलं, “काय रे तू सध्या काय करतोस?” तो म्हणाला की, “डिप्लोमा इंजिनीरिंगचा अभ्यास करत आहे.” तर ते म्हणाले, “मग विवेकानंद सेवा मंडळमध्ये ये आणि लायब्ररी जॉईन कर.” त्यानी जायचं ठरवलं. त्याला वाटलं लायब्ररी म्हणजे चांगली मोठी असेल. तर काय? तिथे काही थोडी पुस्तकं होती. पण तरीही तो जोडला गेला. जिथे जिथे पुस्तके मिळतील, तिथून तिथून स्वतः जाऊन पुस्तकं गोळा करायचे, अगदी शहाड, कल्याण, दादर… जिथे जिथे मामांच्या संपर्कातून पुस्तकं मिळू शकतील, अशा ठिकाणाहून ती उचलून घेऊन यायची, असं सुरू झालं.
हळूहळू वाचक संख्या आणि पुस्तक संख्याही चक्रवाढ व्याजाने वाढायला सुरुवात झाली. एका तरुण कार्यकर्त्यांकडे एक रिकामा फ्लॅट होता, तो त्याने लायब्ररी चालवायला दिला. त्या दोन-तीन वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणावर काम वाढले आणि त्यामुळे भाड्याचे किंवा स्वतःची जागा घेणं क्रमप्राप्त ठरलं. मग एक भाड्याची जागा घेऊन तिथे वाचनालय सुरू केलं. संघ धुरिणांनी १९९३ मध्ये युवक कार्यकर्त्यांसाठी अभ्यासवर्ग आयोजित केला. दामू अण्णा दाते नावाचे एक अतिशय ऋषितुल्य असेच संघाचे प्रचारक होते. त्यांनी कार्यकर्त्यांचा पहिला अभ्यासवर्ग घेतला आणि मग त्यानंतर वेगवेगळ्या सेवा प्रकल्पांना धुमारी येऊ लागली. विवेकानंद यांच्या नावाने आपण सेवा मंडळ चालवत आहोत, तर नुसते विवेकानंदांचे विचार वाचून चालणार नाहीत, तर ते प्रत्यक्षात आणले पाहिजेत.
स्वामी विवेकानंद यांनी ‘सेवा केली पाहिजे’ असा मंत्र दिला होता, त्यानुसार संघाच्या वनवासी कल्याण आश्रमाचा एक उपक्रम होता. त्यातून त्यांनी विहिगाव नावाचं एक खेडेगाव विकास करण्यासाठी घेतलं. शिक्षण घ्या, शिक्षण घ्या, सांगणं सोपं आहे, पण मुलगा शिक्षण घ्यायला गेला, तर आम्ही खायचं काय, असा प्रश्न एका कष्टकरी आदिवासीने विचारल्यावर अशा गावांमध्ये मुळापासून काम सुरू करणं गरजेचं आहे, हे जाणवलं आणि म्हणून मग १९९५-९६ला संस्थेने हे गाव दत्तक घ्यायचं ठरवलं. दर महिन्याला एक आरोग्य शिबीर भरवायला सुरुवात केली. सुरुवातीला ग्रामीण, कष्टकऱ्यांचा विश्वास नसे. एकदा नेत्रनिदान शिबीर लावलं. हे शिबीर लागायच्या आधी अनेकांनी, ‘आम्हालाही आमच्या घरच्या म्हातारा-म्हातारीचे डोळे तपासायचे आहेत,’ असं सांगितलं होतं. पण शिबीर लावल्यावर एकही माणूस तिथे आला नाही. घरोघरी जाऊन २-४ जणांना कार्यकर्त्यांनी गोळा केले. नंतर कारण कळलं की, त्यांना घेऊन येण्यासाठी माणूस नसायचा. घरातला कर्ता माणूस शेतावर कष्ट करायला जात असे. तो आला तर, त्या दिवशीची रोजंदारी जाणार म्हणून ते येत नसत. शेवटी त्यांच्या घरी जाऊन गाडीने त्यांना आणून पोहोचवायची सोय केली आणि दोन-चार का होईना, म्हाताऱ्या माणसांना वैद्यकीय सेवा पुरवली; परंतु नंतर गावकऱ्यांचा ओढा वाढत गेला आणि अशा तऱ्हेची शिबिरं दहा ते बारा वर्षं सातत्यानं संस्थेने या गावात भरवली.
महिलांच्या हाताला काम हवं, हे लक्षात आल्यानंतर मेणबत्त्या, वैद्यकीय पिशव्या, उटणे बनवणे अशी कामं त्यांना द्यायला सुरुवात केली. आज दोन गावांमध्ये दहा-अकरा महिला बचत गट वर्षभर उत्तम काम करत आहेत. सुरुवातीला गावकऱ्यांचा कार्यकर्त्यांवर विश्वास नसायचा. त्यांना वाटायचं यांना पैसे मिळत असणार म्हणून हे लोक येत आहेत; परंतु जेव्हा त्यांना कळलं की, सेवाभावी वृत्तीने हे कार्यकर्ते येथे काम करत आहेत, तेव्हा त्यांनी सहकार्य द्यायला सुरुवात केली. चार वर्षांनंतर त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर तिथे संस्थेनं भारत विकास परिषद, टिळक नगर गणेशोत्सव संस्था यांच्या सहकार्याने तीन धरणं बांधली.
त्यानंतर आणखी दोन गावं विकासासाठी घेतली. पालघर जिल्ह्यातले अतिशय दुर्गम भागात असलेले खोडदे गाव आणि शहापूरजवळचं अंदाड या दोन गावांमध्ये दरवर्षी संस्थेचे कार्यकर्ते जातात. त्यांना लागेल ती मदत करतात. त्यानिमित्तानं तीस-चाळीस तरुण कार्यकर्त्यांना आदिवासी जीवन पाहता येतं. आजपर्यंत मंडळाचे २०० सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि मंडळाच्या विविध उपक्रमांमध्ये हजाराहून अधिक कार्यकर्ते, सहकारी, मदतकर्ते सहभागी आहेत. हे सर्व कार्य पाहून १० वर्षांपूर्वी डोंबिवली महानगरपालिकेने संस्थेला ३० वर्षांच्या लीजवर एक जागा दिली. त्या जागेवर “बांधा आणि वापरा” या तत्त्वानुसार आज संस्थेची दोन मजली इमारत उभी आहे. या इमारतीमध्ये वाचनालय आणि अभ्यास कक्ष सुरू आहे.
डोंबिवलीतील म्युनिसिपालटीच्या शाळा दत्तक घेतल्या आणि त्यांना सामग्री दिली. शिवाय संस्थेचे कार्यकर्तेही येथे मुलांना शिकवत आहेत. कोविड काळातही संस्थेनं खूप मोठं कार्य केलं. जिकडून मागणी येईल, तिकडे अन्नधान्य, औषधवाटप पुरवण्याचं काम करायचं, असं ठरवलं. आजपर्यंत गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या जवळजवळ सहा हजार जणांना अन्नधान्य, औषधांचं वाटप केलं आहे. या कामासाठी नुकताच राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते संस्थेला पुरस्कार मिळाला आहे. संस्था स्थापन होऊन ३१ वर्षांचा काळ लोटला आहे आणि या काळात जवळजवळ आठ ते दहा हजार विद्यार्थ्यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचा लाभ घेतला आहे. गावांमध्ये प्रकल्प अधिकाधिक वाढवणं तसंच अधिकाधिक चांगले तरुण कार्यकर्ते घडवणं यादृष्टीने सध्या संस्थेची वाटचाल
सुरू आहे.