Friday, May 9, 2025

देशमहत्वाची बातमी

देशात ‘ओमायक्रॉन’चा एकही रुग्ण नाही

देशात ‘ओमायक्रॉन’चा एकही रुग्ण नाही

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्यसभेत मंगळवारी मोठी आणि दिलासा देणारी बातमी दिली. देशात अद्याप तरी ‘ओमायक्रॉन’चा एकही रुग्ण नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्यसभेत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी देशाला दिलासा देणारी बातमी दिली. देशात ‘ओमायक्रॉन’चा एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही, असे त्यांनी सांगितले.


आतापर्यंत १६ देशांमध्ये ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंटचा संसर्ग पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिका, बॉट्सवाना, ब्रिटन, नेदरलंड, जर्मनी, हॉंगकॉंग, इटली, बेलजियम, इस्रायल, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, झेक रिपब्लिक, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, पोर्तुगाल आणि स्पेन या देशांमध्ये ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झाल्याचे रुग्ण आढळले आहेत.


दरम्यान, ‘ओमायक्रॉन’बाबत केंद्र सरकारने राज्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंट ‘आरटीपीसीआर’ आणि ‘आरएटी’ या चाचण्यांमधून निसटू शकत नाही. त्यामुळे राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी रुग्णांचा शोध लवकरात लवकर घेण्यासाठी चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवावी. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर बारकाईने लक्ष ठेवावे आणि हॉटस्पॉटमध्ये नियमांचे कठोर पालन करावे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.


केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांसोबत मंगळवारी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. ‘ओमायक्रॉन’चे रुग्ण अनेक देशांमध्ये आढळून आल्याने त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी बैठक घेत राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमधील तयारीचा आढावा घेतला. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यावर केंद्रीय आरोग्य सचिवांनी बैठकीत भर दिला. राज्यांनी कुठल्याही स्थितीत हलगर्जीपणा किंवा ढिसाळपणा येऊ देऊ नये. देशातील विविध विमानतळांवर उतरणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर अतिशय कडक नजर ठेवावी. आंतरराष्ट्रीय विमानतळे, बंदरे आणि सीमांवरही अतिशय कडक पाहारा ठेवावा, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

Comments
Add Comment