Friday, May 16, 2025

क्रीडा

ड्रीम इलेव्हन वेंगसरकर क्रिकेट अकादमीला विजेतेपद

ड्रीम इलेव्हन वेंगसरकर क्रिकेट अकादमीला विजेतेपद

मुंबई (प्रतिनिधी) : ड्रीम इलेव्हन वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने ओव्हल मैदान, चर्चगेट येथे आयोजित केलेल्या १२ वर्षांखालील मुलांच्या ड्रीम इलेव्हन कप क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीच्या लढतीत त्यांनी भोसले क्रिकेट अकादमी संघावर ७ विकेटनी मात करून विजेतेपदाला गवसणी घातली.


प्रथम फलंदाजी करणाऱ्या भोसले क्रिकेट अकादमी संघाला निर्धारित २० षटकांमध्ये केवळ ७ बाद ९६ धावांची मजल मारता आली. यात आर्यन म्हात्रे याने सर्वाधिक २२ धावा केल्या. श्रीदीप आढागळे (२२ धावांत २ बळी) आणि दर्शन राठोड (२० धावांत २ बळी) यांनी प्रत्येकी दोन विकेट मिळविल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ड्रीम इलेव्हन वेंगसरकर क्रिकेट अकादमीने केवळ १६.४ षटकांमध्ये ३ विकेट गमावून हे आव्हान लीलया पार केले. या लढतीत सर्वाधिक ५४ धावा करणारा आयुष शिंदे विजयाचा शिल्पकार ठरला. आयुष शिंदेने यापूर्वीच्या लढतीत युवा अर्जुन संघाविरुद्ध खेळताना केवळ ६२ चेंडूंत नाबाद शतकी खेळी केली होती. आयुषला अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.


संक्षिप्त धावफलक : भोसले क्रिकेट अकादमी - २० षटकांमध्ये ७ बाद ९६ धावा (आर्यन म्हात्रे २२, श्रीदीप आढागळे २२ धावांत २ गडी, दर्शन राठोड २० धावांत २ गडी) पराभूत वि. ड्रीम इलेव्हन वेंगसरकर क्रिकेट अकादमी - १६.४ षटकांमध्ये ३ बाद ९७ धावा (आयुष शिंदे ५४).

Comments
Add Comment