कणकवली पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे झाले शानदार उद्घाटन
संतोष राऊळ
कणकवली : ‘‘मला कणकवली पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी बोलावलंत, मानसन्मान दिलात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचा मी आभारी आहे. मी साहेब नाही… जनतेचा सेवक आहे… दिल्लीत असेन किंवा महाराष्ट्रात, नारायण राणे हा तुमचा सेवक आहे आणि सेवकच राहणार. कधीही हाक द्या, मी तुमच्या सेवेसाठी तत्पर असेन’’, असे भावनिक आवाहन कणकवली तालुक्यातील जनतेला केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले. कणकवली पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मंगळवारी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
राणे पुढे म्हणाले, ‘‘कणकवली पंचायत समितीच्या या नव्या इमारतीतून जनतेचे प्रश्न सोडविले जातील. सेवक म्हणून माझा प्रत्येक सदस्य काम करेल. सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी पंचायत समिती या स्वायत्त संस्था म्हणून स्थापन केल्या आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जनतेपर्यंत विकास प्रक्रिया नेण्याची जबाबदारी आपल्यावर दिली. कणकवली तालुक्यात एकमताने सर्व सदस्य काम करतात. जनतेच्या विकासासाठी झटतात. हे पाहून समाधान वाटते. असेच काम करा, नव्या वास्तूमधून नव्या संकल्पना राबवा. जनतेचे हित तेच आपले हित आहे, हे ध्यानात ठेवून नम्रपणे काम करा.’’
उन्हाने तापल्याशिवाय विचाराने तापता येत नाही. तरी तुम्हाला उन्हात बसावे लागले याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगतानाच राणे म्हणाले, सभापती, उपसभापती आणि सदस्यांनी नवीन कायदे, अधिकार आणि विकास प्रकिया समजून घेण्यासाठी नवनवीन पुस्तके वाचावीत. तरबेज सभापती, उपसभापती व सदस्य असतील, तर तुम्ही अजूनही चांगले काम कराल. तुमचे भविष्य घडेल. ‘पक्ष आपल्याला पदे देतो. ही पदे रस्ते, पाणी, वीज, शिक्षणाची व्यवस्था, शेतीसाठी लागणाऱ्या योजना राबविण्यासाठी आणि शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी उपयोगात आणा. कणकवलीत जसे काम होते आहे, तसे जिल्ह्यात भाजपच्या विचारांचा प्रत्येक सदस्य आणि कार्यकर्ता करेल’, असा विश्वासही यावेळी राणे यांनी व्यक्त केला.
‘कणकवलीच्या नूतन इमारतीच्या आतील कारभार सुबक झाला पाहिजे. तेव्हाच इमारत सुंदर दिसेल. नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावेत, त्यासाठी ही इमारत आहे. यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले, त्यामुळेच पदाधिकारी त्या पद्धतीने काम करत आहेत. कणकवलीत कुठलेही मतभेद नाहीत. विकासाची जाण, जाणीव झाल्याशिवाय कामे होत नाहीत. कणकवली नूतन पंचायत समितीच्या इमारतीतून लोकाभिमुख कामे करा’, असा सल्ला पदाधिकऱ्यांना राणे यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रस्थाविक सभापती मनोज रावराणे यांनी केले, तर आभार उपसभापती प्रकाश पारकर यांनी मानले. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन राजेश कदम आणि नितीन पाटील यांनी केले.
यावेळी माजी खासदार आणि भाजप प्रदेश सचिव निलेश राणे,आमदार नितेश राणे,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संजना सावंत,सभापती मनोज रावराणे,भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी सभापती तुळशीदास रावराणे,उपसभापती प्रकाश पारकर,जिल्हा परिषद सदस्य, संजय देसाई,बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण,समाजकल्याण सभापती अंकुश कदम,श्रिया सावंत,आदी उपस्थित होते.