नाशिक (वार्ताहर) : नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटी येथील कुसुमाग्रज नगरीत ३ ते ५ डिसेंबरदरम्यान १४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या मुख्य मंडपाचा भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला, तर या साहित्य संमेलनाचे गीतकार मिलिंद गांधी यांचा मंगळवारी येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात गौरव करण्यात आला. या संमेलनासाठी ६० मीटर रुंदीचे आणि २५० मीटर लांबीचे लॉग स्पेन असलेले जर्मन स्ट्रक्चर वापरून एक मोठा हॉल बनविण्यात येत आहे. साधारण सात हजार लोकांची एकाच वेळी मोकळेपणे बसता येईल, अशी व्यवस्था या भव्य मंडपात करण्यात आली आहे, अशी माहिती समितीकडून देण्यात आली.
या व्यतिरिक्त दोन्ही बाजूस मोकळी जागा आणि इतर सोयी ठेवलेल्या आहेत. स्टेजच्या मागच्या बाजूला व्हीआयपी कक्ष व पुढील बाजूला मीडियासाठी जागा, त्यानंतर व्हीआयपी सेटिंग असेल, स्टेजचा आकार साधारण ८० फूट बाय ४५ फूट असेल. व्यासपीठावर तीन वेगवेगळ्या लेव्हल्स ठेवण्यात येतील. स्टेजच्या दोन्ही बाजूस एलईडी वॉल असतील. या सभागृहात येण्यासाठी साधारणपणे पाच द्वार असतील. या सभागृहातच नंतर मान्यवरांची जेवणाची व्यवस्था करण्यात येईल. त्यामागे किचनची व्यवस्था असेल. या पूर्ण सभागृहात एकूण वेगवेगळ्या ठिकाणी १२ एलईडी स्क्रीन असतील, जेणेकरून सभागृहात बसलेल्या लोकांना कुठल्याही अडचणीविना पूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेता येईल.
या व्यतिरिक्त संमेलन स्थळी एक उपमंडप असेल. ज्याची क्षमता २५० सिटिंगची असेल. या उपमंडपाच्या व्यतिरिक्त इतर तीन सभागृह असतील. या सभागृहांची क्षमता दीडशे लोकांची असेल. त्याव्यतिरिक्त बालकवी मंच, कवी कट्टा, गझल कट्टा, पुस्तक प्रदर्शन मंच आणि ग्रंथप्रदर्शन असेल. संमेलन नाशिकमध्ये होत असल्याने नाशिकचे वैभव विस्तृतपणे सांगणारे नाशिकचे पॅव्हेलियन येथे असेल. महाराष्ट्राच्या खाद्यपदार्थांची चव चाखायला मिळावी याकरता संमेलनामध्ये स्टॉल्स लावण्यात येणार आहेत.
या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने लेखक मिलिंद गांधी यांनी गीत तयार करून ते प्रसिद्ध केले. त्यामुळे येथील गोल्फ क्लब मैदानावर त्यांचा आज जॉगर्स क्लबचे अध्यक्ष संजय ओढेकर, नाना निकुंभ, शेखर निकुंभ, प्रकाश बनकर, कृष्णा नागरे, जगदीश पोतदार, जयंत महाजन आदींच्या उपस्थितीत सम्मानित करण्यात आले.