कोलकाता (वृत्तसंस्था) : भारताने न्यूझीलंडवर टी-ट्वेन्टी मालिका ३-० अशी जिंकत पाहुण्यांना क्लीन स्वीप दिला. नवा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड या जोडगोळीने पहिल्याच मालिकेत मोठी कामगिरी केली. या निर्भेळ मालिका विजयानंतर राहुल द्रविड यांनी भारतीय संघाला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. हुरळून जाऊ नका, पाय जमिनीवर ठेवण्याची गरज असल्याचे द्रविड म्हणाले.
द्रविड म्हणाले की, टी-ट्वेन्टी मालिका भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरली. प्रत्येक खेळाडूने सुरुवातीपासूनच मालिकेत चांगली कामगिरी केली. आम्हाला वास्तवाकडेही लक्ष ठेवावे लागेल. आम्हाला आपले पाय जमिनीवर ठेवावे लागतील आणि या विजयाने हुरळून जाऊ नका, असा सल्ला राहुल द्रविड यांनी दिला आहे.
पुढे द्रविड म्हणाले की, टी-ट्वेन्टी विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणे आणि त्यानंतर ३ दिवसांतच मालिकेसाठी तयार होणे, सहा दिवसांत ३ सामने खेळणे हे न्यूझीलंडसाठी सोपे नव्हते. आमच्यासाठी हा विजय आनंददायी आहे. यातून आपल्याला शिकावे लागेल. पुढच्या दोन वर्षांपर्यंत मोठा प्रवास आहे. त्यामुळे आपल्यालाही अप्स आणि डाऊनचा सामना करावा लागेल.
या मालिकेत युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. ज्या खेळाडूंना गेल्या काही महिन्यांमध्ये संधी मिळाली नाही, अशा खेळाडूंना संधी दिली. आपल्याकडे चांगले पर्याय आहेत. पुढच्या टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेला १० महिन्यांचा कालावधी आहे. सध्या काही सीनियर खेळाडू संघाबाहेर आहेत. त्यांच्या येण्याने संघ आणखी मजबूत होईल. तरीही आपल्या तयारीमध्ये कोणतीही कमतरता ठेवायची नसल्याचे द्रविड म्हणाले.
भारताचा न्यूझीलंडला क्लीन स्वीप
रोहित शर्माचे धडाकेबाज अर्धशतक आणि अक्षर पटेलच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवत पाहुण्यांना क्लीन स्वीप दिला. भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी १८५ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडला सुरुवातीलाच अक्षर पटेलने तीन धक्के दिले आणि त्यांचे कंबरडे मोडले. त्यातून न्यूझीलंडचा संघ सावरू शकला नाही. त्यामुळे भारताने मालिकेतील शेवटचा सामना सहज खिशात घालत मालिका ३-० अशी जिंकली.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडला अक्षरने तिसऱ्या षटकात दुहेरी धक्के दिले. अक्षरने तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर डॅरिल मिचेलला बाद केले, मिचेलला यावेळी पाच धावा करता आल्या. अक्षरने या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मार्क चॅम्पमनला बाद करत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. मार्कला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. अक्षरने त्यानंतर पाचव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ग्लेन फिलीप्सला शून्यावर बाद केले. एका बाजूने या विकेट्स पडत असताना सलामीवीर मार्टिन गप्टिल मात्र दमदार फलंदाजी करत होता. गप्टिलने यावेळी आपले अर्धशतकही झळकावले. पण युजवेंद्र चहलने गप्टिलला ५१ धावांवर बाद केले आणि त्यावेळीच न्यूझीलंडचा पराभव साफपणे दिसायला लागला. त्यानंतर न्यूझीलंडचा एकही फलंदाज जास्त काळ टिकाव धरू शकला नाही आणि भारताने मोठा विजय साकारला.