देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
मुंबई (प्रतिनिधी) : ‘भाजप हा आपल्याच बळावर जिंकतो, हा शिवसेनेचा भ्रम होता. शिवसेनेच्या या भ्रमाचा भोपळा आता फुटला आहे व शिवसेना तोंडावर आपटली आहे’, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली आहे. मुंबईत भाजपच्या सर्व प्रभाग, उपविभाग आणि जिल्हा प्रभारी यांच्या संयुक्त बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर हा जोरदार हल्ला चढवला आहे. येत्या काळात भाजप भरवशाचे असे स्वत:चे सरकार आणून दाखवेल. कोरोना संकट काळात देखील मुंबई महानगरपालिकेने भ्रष्टाचार करण्यात आपला पहिला नंबर लावला. कोरोना काळातही हे सरकार सपशेल तोंडावर पडलेले महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे. २०१७च्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला होता. शिवसेनेचा भ्रम होता की, भाजप हा शिवसेनेच्या बळावर जिंकतो. पण शिवसेनेचा भ्रमाचा हा भोपळा फुटला असून शिवसेना तोंडावर पडली असल्याची टीका फडणवीस यांनी केली. राज्यात २०२४ आधी आपले सरकार आल्यावर जनतेच्या कल्याणाकरिता आणि विकासाकरिता आपण काम करू,’ असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
‘सेवाही समर्पण’ अभियान जोरात
मुंबई भाजप आता घरोघरी जाऊन ‘सेवाही समर्पण’ या अभियानांतर्गत मुंबईतील नागरिकांना मदत करत आहे. त्यासोबतच मुंबई भाजपने विविध समाजांकरिता ‘चौपाल’ हे सामाजिक व्यासपीठ आयोजित केले आहे. त्याच्या माध्यमातून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या, समजून घेतल्या आणि त्या सोडविण्याचा प्रयत्न केला असल्याचे मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
चौपाल सत्रांचे आयोजन
लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई भाजप आपल्या १ लाख ४० हजार बुथ प्रमुखांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचून लोकांना मदत करत आहे. मुंबईतील सर्वसामान्य जनतेला विविध समाजोपयोगी योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी पक्षाने आतापर्यंत प्रत्येक प्रभागात ‘उत्तर भारतीय मोर्चा’च्या माध्यमातून ५०० हून अधिक चौपाल सत्राचे आयोजन केले आहे. भविष्यात पाचशेहून अधिक चौपाल सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच मुंबईतील मराठी माणसांना भेडसावणाऱ्या समस्या मांडण्यासाठी ‘मराठी कट्टा’ हे व्यासपीठ आयोजित केले जात आहे.
त्यात नागरिकांच्या समस्यांचे योग्य प्रकारे निराकरण केले जाते. त्याचप्रमाणे विविध समाज गटांसाठी अनेक योजना व कार्यक्रम राबविले जात असल्याची माहिती लोढा यांनी यावेळी दिली.
तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न
नवरात्री सणाचे औचित्य साधत ‘महिलांचा सन्मान व स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले. त्याच मोहिमेअंतर्गत मुंबई शहरातील महिला स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात आली. तरुणांच्या भविष्याला योग्य दिशा मिळण्याकरिता ‘करिअर दिशा’ या उपक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. अशा अनेक योजना मुंबई भाजपतर्फे आयोजित करून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे लोढा यांनी सांगितले.