देशाच्या विकासाचा महामार्ग हा चांगल्या आणि मजबूत रस्त्यांच्या जाळ्यांतून साकारला जातो. देशातील सर्व महत्त्वाच्या शहरांना, ठिकाणांना तसेच गाव – खेड्यांना जोडणारे सुटसुटीत रस्ते जर असतील, तर त्या – त्या ठिकाणी सहजपणे पोहोचणे शक्य होईल. म्हणजेच त्या भागांतील उद्योग – व्यवसायांना लागणारा कच्चा माल सहजगत्या उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पादन वाढीला चालना मिळून तेथील उत्पादित माल विविध बाजारपेठांमध्ये पोहोचविणे शक्य होईल. त्या भागांमध्ये रोजगाराच्या संधीही मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊन बेकारीचा प्रश्न निकाली लागू शकेल. तसेच शेतीतून निघणारे उत्पादन हे संबंधित कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आणि अन्य बाजारपेठांमध्ये पोहोचविणे चांगल्या रस्त्यांच्या सुविधेमुळे शक्य होऊन शेती व्यवसाय आणि त्यावर आधारित अन्य पूरक उद्योगांचीही चांगलीच भरभराट होणे शक्य होईल. याचाच अर्थ दळणवळणाची सुविधा जर चांगल्या प्रकारे उपलब्ध असेल, तर त्या संपूर्ण परिसराचा विकास होणार ही बाब ध्यानी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रस्ते विकासावर चांगलाच भर दिला. विशेष म्हणजे ही मोठी जबाबदारी त्यांनी आपले विश्वासू सहकारी नितीन गडकरी यांच्याकडे सुपूर्द केली आणि गडकरी यांनीही आपल्यावर टाकलेला विश्वास वेळोवेळी सार्थ ठरवून दाखविला आहे. त्यामुळेच देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशकडे लक्ष पुरवून या राज्याचा विकास केल्यास त्याचा फार मोठा लाभ भाजपला आणि पर्यायाने देशाला होऊ शकतो, ही बाब हेरून पंतप्रधान मोदींनी या मोठ्या राज्यातील वाराणसी हा मतदारसंघ आपल्यासाठी निवडला आणि तेथून विक्रमी मतांनी निवडून येत या मतदार संघाबरोबरच संपूर्ण राज्याच्या विकासाकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले. या राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी तरुण तडफदार अशा योगी आदित्यनाथांची निवड केली. या दोघांनी मिळून उत्तर प्रदेशचा नक्षा पूर्णत: बदलण्याचा जणू ध्यासच घेतलाय, असे तेथील विकासकामांवरून सिद्ध होत आहे.
देशातील हे प्रमुख राज्य आपल्या हातात कायमचे राहावे यासाठी मोदींनी तेथे लक्ष पुरविले आणि ३४० किमी लांबीचा महाकाय म्हणावा, असा मजबूत पूर्वांचल द्रुतगती महामार्ग उभारण्याचे ठरविले. हा महामार्ग उभारून भाजपने पूर्वेकडील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याची पुरेपूर तयारी केली आहे. या एक्स्प्रेस-वेवर ३.४ किमीची हवाई धावपट्टी असून ते एक प्रमुख आकर्षण आहे. नऊ जिल्ह्यांतून हा द्रुतगती महामार्ग जातो. त्यामुळे या महामार्गामुळे उत्तर प्रदेशच्या विकासाला मोठा वेग मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच करवाल खेरी येथील सोहळ्यात या महामार्गाचे लोकार्पण केले. हा एक्स्प्रेस-वे म्हणजे उत्तर प्रदेशच्या विकासाचा एक्स्प्रेस-वे ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे, तीन वर्षांपूर्वी मोदी यांनी या पूर्वांचल एक्स्प्रेस वेचा शिलान्यास केला होता. त्यावेळी एक दिवस या एक्स्प्रेस-वेवर विमाने उतरतील, असा विचारही आपण केला नव्हता. पण आज ते स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे, असे कौतुक मोदी यांनी यावेळी केले. जगभरात ज्यांना उत्तर प्रदेश आणि येथील लोकांच्या सामर्थ्यांवर कधीच विश्वास नव्हता, अशांनी प्रत्यक्षात सुल्तानपूरमध्ये येऊन उत्तर प्रदेशचे हे सामर्थ्य पाहिल्यास त्यांचा विश्वास बसेल, असे या महामार्गाचे अविश्वसनीय असे काम झाले आहे. गाझीपूर या जिल्ह्यांच्या आर्थिक विकासाला मोठी चालना देईल.
या द्रुतगती महामार्गावर सुलतानपूरमधील कुरेभर गावाजवळ ३.२ किमी लांबीची धावपट्टी तयार करण्यात आली आहे. सुखोई आणि मिराज यांसारखी लढाऊ विमाने येथे फ्लायपास्ट करतील. विशेष म्हणजे, या महामार्गाच्या उद्घाटनाच्या आधी येथे एक ‘एअर-शो’ आयोजित करण्यात आला व त्याच्या माध्यमातून देशाने सर्व जगाला आपल्या शौर्याचे आणि पराक्रमाचे दर्शन घडविले. हा एक्स्प्रेस-वे म्हणजे यूपीच्या वाढत्या अर्थव्यवस्थेचा जणू एक्स्प्रेस-वे आहे. हा एक्स्प्रेस-वे यूपीची शान बनला आहे, हे यूपीचे नवे आश्चर्य आहे. येथून विमानांची गर्जना होईल तेव्हा ज्यांनी अनेक दशकांपासून संरक्षण पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले त्यांना ती चपराक असेल. देशाची समृद्धी जितकी महत्त्वाची आहे तितकीच देशाची सुरक्षाही मोलाची आहे. त्यामुळेच लष्कराची लढाऊ विमाने या पूर्वांचल द्रुतगती मार्गावर उतरतील तेव्हा या विमानांची गर्जना ऐकून सुरक्षेशी खेळ करणाऱ्यांच्या छातीत धडकी भरवतील हे नििश्चत. हा महामार्ग ठरविलेल्या वेळेच्या आधीच बांंधून पूर्ण झाला आहे. त्यामुळे यावरील खर्चही आटोपशीर झाला असून निधीची मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे. अशा प्रकारे हा महामार्ग पूर्ण होताक्षणी फायद्यात आहे, ही लक्षणीय बाब म्हटली पाहिजे. कारण आपल्याकडे बरेचदा प्रकल्प, रस्ते प्रकल्प हे वेळेत पूर्ण होताना दिसत नाहीत आणि त्यामुळे त्यावरील खर्चही दामदुपटीने वाढतो आणि प्रकल्प पूर्ण होण्याआधीच भलामोठा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे या वेळेपूर्वी तयार झालेल्या महामार्गाबाबत केंद्रीय रस्तेविकासमंत्री नितीन गडकरी यांनाही विशेष धन्यवाद द्यायलाच हवेत. म्हणूनच गडकरींनी महाराष्ट्रातील अनेक विशेषत: मुंबई – गोवा महामार्गाबरोबरच अन्य अपूर्णावस्थेतील प्रकल्पांकडे लक्ष देऊन ते पूर्णत्वास नेल्यास राज्यातील जनता त्यांना भरभरून दुवा देईल.