कीर्ती केसरकर
नालासोपारा : पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी वसईत बुधवारी दौरा केला. यावेळी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. तसेच जिल्हा नियोजनाच्या दृष्टिकोनातून काही प्रकल्पांची माहिती घेतली. याचबरोबर सर्वपक्षीय आढावा बैठकीत विविध प्रकल्पांबाबत चर्चा करण्यात आली; परंतु प्रकल्प निश्चित झाले असले तरी त्यासाठी लागणारी जागा अजूनही निश्चित झालेली नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या दौऱ्याचे नेमके फलित काय, असा सवाल स्थानिक वसईकर आहेत.
पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी वसई दौऱ्यात विविध प्रकल्पांवर चर्चा करण्यासोबतच जिल्हा नियोजनाच्या विविध कामांची पाहणी केली. यामध्ये अमृत योजना, क्रीडा, शासकीय कार्यालय, कायमस्वरूपी पोलीस ठाणे यासारखे प्रकल्प राबवण्याची चर्चा केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन पद्धतीने लोकार्पण केलेल्या तसेच भूमिपूजन केलेल्या विविध कामांची सद्यस्थिती जाणून घेतली.
दौऱ्यानंतर झालेल्या सर्वपक्षीय आढावा बैठकीत विविध प्रकल्पांबाबत चर्चा करण्यात आली. भविष्यात वसईमध्ये सायकल ट्रॅक उभारणी, पोलीस ठाण्यासाठी कायमस्वरूपी जागा, कायमस्वरूपी आरटीओ कार्यालय तसेच पासपोर्ट कार्यालय उभारणी यासारख्या प्रकल्पांबाबत चर्चा करण्यात आली; परंतु हे प्रकल्प उभारायचे असले तरी पण अद्यापही जागा निश्चित करण्यात आलेली नाही. तसेच ती जागा ठरवण्यातही आलेली नाही. विरार येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसईमध्ये अशा अनेक मोकळ्या जागा आहेत, ज्यांचा उपयोग विविध कामांसाठी केला जाणार आहे; परंतु त्या जागा अजूनही निश्चित करून त्या संपादन करण्यात आलेल्या नाहीत.
त्याचप्रमाणे, क्रीडा मैदाने, खेळण्यासाठी ग्राऊंड असे प्रकल्प उभारण्यासाठीही जागांचा शोध सुरू आहे. महानगरपालिका मुख्यालयाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. तसेच सतत बंद होणारे सिग्नल, वाहतूक कोंडी, खासगी रुग्णालयांकडून होत असलेली लूटमार, नागरिकांचे होत असलेली फसवणूक, असे विविध प्रश्न विचारल्यानंतर पालकमंत्र्यांनी यावर कोणते उत्तर न देता खुर्ची सोडली.
सर्वधर्मीय दफनभूमी तसेच स्मशानभूमी उभारण्यासाठीही जागा शोधण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला आहे. लवकरात लवकर जागा शोधून त्या ठिकाणी सर्वधर्मीयांच्या अंत्यविधीसाठी विविध जागा निवडाव्यात, असेही आदेश देण्यात आलेले आहेत. ज्या ठिकाणी कोणाचाही विरोध होणार नाही तसेच कोणत्याही धार्मिक भावनांना ठेच लागणार नाही, अशा जागा लवकर ठरवून सर्व स्मशानभूमी बांधण्यात येणार आहे. दरम्यान, नवनवीन प्रकल्प उभारण्यात येणार असले तरी जागेची निश्चिती नसतानाही फक्त चर्चा करण्यासाठी हा दौरा होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रश्नांच्या भडीमारानंतर पालकमंत्र्यांनी खुर्ची सोडली
भुसे यांनी दौरा करत असतानाच अमृत योजनेची पाहणी केली. तसेच लोकार्पण आणि भूमिपूजन केलेल्या कामांची सद्यपरिस्थिती काय आहे, याचीही पाहणी केली; परंतु यावर कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात आली नाही. अमृत योजनेअंतर्गत किती काम पूर्ण झाले आहे, याची माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली नाही. शिवाय प्रकल्प उभारण्यासाठी कोणती जागा ठरवण्यात आलेली आहे किंवा अद्यापही निश्चित का झाली नाही? याबद्दलही कोणतेही उत्तर पालकमंत्र्यांकडून आले नाही. तसेच प्रश्नांचा भडीमार झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी खुर्चीवरून उठत थेट पळ काढला आहे.