Friday, January 16, 2026

मोहम्मद आमिरला कोरोनाची लागण

मोहम्मद आमिरला कोरोनाची लागण

इस्मामाबाद (वृत्तसंस्था) : पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला कोरोनाची लागण झाली आहे. आमिरने स्वत: ट्वीट करून माहिती दिली. चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे अबुधाबी येथे होणाऱ्या आगामी टी-१० लीगमध्ये तो भाग घेऊ शकणार नाही. आमिरने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती; परंतु पाकिस्तान संघाचे व्यवस्थापन बदलल्यानंतर त्याने पुन्हा पुनरागमनासाठी होकार दिला आहे.

मोहम्मद आमिर अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे तो जगभरात चालणाऱ्या विविध फॉरमॅटच्या लीगमध्ये सहभागी होत आहे. सप्टेंबरमध्ये संपलेल्या कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये त्याने भाग घेतला, ज्यामध्ये त्याची कामगिरी सरासरी होती. आता तो शुक्रवार १९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या टी-१० लीगमध्ये भाग घेणार होता, पण कोरोनामुळे तो या मोठ्या स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही.

मी या वर्षी टी-१० लीग खेळणार नाही, कारण मला कोरोनाची लागण झाली आहे. पण आता मी ठीक आहे. लवकर बरे होण्यासाठी तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांची गरज आहे, असे ट्विट मोहम्मद आमिरने केले आहे.

टी-ट्वेन्टी विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा पराभव केल्यामुळे पाकिस्तानी चाहते आणि खेळाडूंनी जल्लोष केला. मात्र आमिरने ट्विटरवर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगवर कमेंट केल्याने दोन्ही खेळाडूंमधील वाद वाढला. हे दोन्ही खेळाडू ट्विटरवर एकमेकांविरोधात खूप बोलले होते.

Comments
Add Comment