सोनू शिंदे
उल्हासनगर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपचे पदाधिकारी प्रवेश करीत असतानाच ओमी कलानीचे निकटवर्तीय असलेले लखी नाथानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे कलानींना बालेकिल्ल्यात भाजपने आवाहन उभे केले आहे.
कलानी कुटुंबाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपचे राजस्थानी सेल अध्यक्ष दिनेश छंगाणी आणि वाल्मिकी सेलचे अध्यक्ष रवी करोतीया यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनतर भाजपही कलानी परिवाराला कडक उत्तर देण्यासाठी कलानी कुटुंबाचे निकटवर्तीय असलेल्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील होते. अखेर भाजप आमदार कुमार आयलानी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी, अमित वाधवा, कपिल अडसूळ, मनीष हिंगोरानी यांच्या प्रयत्नाला यश आले.
कलानीचा बालेकिल्ला असलेल्या खेमानी परिसरातील ओमी कलानी आणि अजित माखिजानी यांचे निकटवर्तीय असलेले लखी नाथानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भविष्य नसल्याने साफ सुधरी छबी असलेल्या भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे नाथानी यांनी सांगितले.