भारत-न्यूझीलंड टी-ट्वेन्टी मालिका आजपासून

Share

मुख्य प्रशिक्षक द्रविड, कर्णधार रोहित केंद्रस्थानी

जयपूर (वृत्तसंस्था) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची टी-ट्वेन्टी मालिका बुधवारपासून (१७ नोव्हेंबर) जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळली जाणार आहे. आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील अपयशानंतर होमग्राउंडवरील मालिकेच्या माध्यमातून यजमान संघ नव्याने सुरुवात करेल. सांघिक कामगिरीसह नवे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि नवा कर्णधार रोहित शर्मा या मालिकेत केंद्रस्थानी असतील.

टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील पराभवाचा बदला घेण्याची संधी

भारत आणि न्यूझीलंडमध्ये आजवर १८ द्वीपक्षीय सामने झालेत. त्यात पाहुण्यांनी १० सामने जिंकून आघाडी घेतली आहे. दोन सामने टाय झाले. त्यात भारताने बाजी मारली. मात्र, उभय संघातील कामगिरी पाहता मागील पाच सामन्यांत भारताकडे ४-१ अशी मोठी आघाडी आहे. दोन्ही संघ युएईत झालेल्या टी-ट्वेन्टीमध्ये गटवार साखळीत आमनेसामने होते. त्यात न्यूझीलंडने बाजी मारल्याने भारताची सलग चार विजयाची मालिका खंडित झाली. रोहितच्या नेतृत्वाखालील संघाला मायदेशात या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.

पाहुणा संघ विल्यमसनविना

पाहुणा संघ नियोजित कर्णधार केन विल्यमसनविना तीन सामन्यांची टी-ट्वेन्टी मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने माघार घेतली आहे. विल्यमसनच्या अनुपस्थितीत अनुभवी वेगवान गोलंदाज टिम साउदीकडे पहिल्या लढतीसाठीचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. विल्यमसन हा टी-ट्वेन्टी मालिकेत सहभागी होत नसला तरी भारतात आला आहे. कसोटी स्पेशालिस्ट सहकाऱ्यांसोबत तो सराव करत आहे. टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये चमकदार फलंदाजी करणाऱ्या आणि कुशल नेतृत्वाने किवींना फायनलमध्ये पोहोचवणाऱ्या विल्यमसनची गैरहजेरी न्यूझीलंडला जाणवेल.

गप्टिल, मिचेल, बोल्टवर किवींची भिस्त

भारताविरुद्धच्या मालिकेत अनुभवी मार्टिन गप्टिलसह वर्ल्डकप गाजवलेला डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, अष्टपैलू जिमी नीशॅमवर पाहुण्यांची फलंदाजीची भिस्त असेल. गोलंदाजीची भिस्त कर्णधार टिम साउदीसह फॉर्मात असलेला ट्रेंट बोल्ट या वेगवान बॉलर्ससह मिचेल सँटनर, ईश सोढी या फिरकीपटूंवर आहे. मात्र, टिम सीफर्ट, मार्क चॅपमन, काइल जॅमिसन, टॉड अॅस्टल, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसनकडूनही किवी संघाला भरीव योगदान अपेक्षित आहे.

संघ : भारत रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ईशान किशन (राखीव यष्टिरक्षक), वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, राहुल चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड – टिम साउदी (कर्णधार), मार्टिन गप्टिल, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, टिम सीफर्ट, मार्क चॅपमन, जिमी नीशॅम, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, काइल जॅमिसन, ईश सोढी, टॉड अॅस्टल, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन.

गुलाबी शहरावर प्रदूषणाची झालर

आठ वर्षांनंतर जयपूरमध्ये आतंरराष्ट्रीय सामना होत आहे. या सामन्यावर दूषित हवामानाचे सावट आहे. जयपूरमधील प्रदूषणाची पातळी गेल्या आठवडाभरात वाढली आहे. सभोवताली असणाऱ्या दिल्ली, गुडगांव, सोनपत यांसारख्या शहरांतील हवामान दूषित झाले असून हवेचा वेग वाढल्याचा जयपूरला फटका बसत आहे. तसेच तेथील अनेक नागरिकांना श्वास घेताना अडचण जाणवत आहे. जयपूरमधील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३३७ पर्यंत घसरला आहे. दिवाळीदरम्यान हा निर्देशांक ३६४ इतका होता. देशातील गेल्या दोन आठवड्यांतील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये जयपूर दुसऱ्या स्थानी आहे.

याआधीही दोन वेळा भारतात प्रदुषित हवामानाचा सामना क्रिकेटला करावा लागला होता. २०१७ मध्ये दिल्लीत श्रीलंकेचे क्रिकेटपटू मास्क घालून मैदानात उतरले होते. तर २०१९ मध्ये भारत-बांगलादेश संघांतील क्रिकेटपटूंना मास्क घालून सराव करावा लागला होता.

फलंदाजीत ‘आर फॅक्टर’ महत्त्वाचा

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-ट्वेन्टी मालिकेत भारतासाठी ‘आर फॅक्टर’ महत्त्वाचा असेल. कर्णधार रोहित शर्मासह उपकर्णधार (लोकेश) राहुल तसेच आघाडी फळीतील आणखी एक फलंदाज ऋतुराज गायकवाडवर यजमानांची फलंदाजीची मदार असेल.

टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील अपयश धुऊन काढतानाच रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतासमोर खेळ उंचावण्याचे आव्हान आहे. टी-ट्वेन्टी प्रकारात सर्वाधिक धावा करण्यात सलामीवीर आणि नवा कर्णधार रोहित हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या खात्यात ३०३८ धावा आहेत. या मालिकेत खेळ उंचावताना रोहितला सहकारी विराट कोहली (३२२७ धावा) आणि न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिलला (३११९ धावा) मागे टाकण्याची संधी आहे. सर्वाधिक सिक्सर ठोकण्यातही रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १४० षटकार ठोकलेत. अव्वल स्थानी असलेल्या गप्टिलला मागे टाकण्यासाठी त्याला आणखी १५ षटकार मारावे लागतील. मात्र, नुकत्याच झालेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये त्याची बॅट तळपली नाही. ५ सामन्यांत ३४.५०च्या सरासरीने त्याला केवळ १७४ धावा जमवता आल्या. रोहितसमोर पुन्हा फॉर्म मिळवण्यासह नेतृत्व कौशल्य सिद्ध करण्याचे आव्हान आहे.उपकर्णधार लोकेश राहुलवरही यजमानांची फलंदाजीची भिस्त आहे. त्याने टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये चांगली फलंदाजी करताना ५ सामन्यांत तीन हाफसेंच्युरी मारल्या. परंतु, त्याला अन्य सहकाऱ्यांची साथ लाभली नाही. राहुलची न्यूझीलंडविरुद्धही चांगली कामगिरी आहे. आयपीएलचे ‘फाइंड’ असलेला युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडकडूनही खूप अपेक्षा आहेत. त्याला जुलैमध्ये श्रीलंका दौऱ्यात संधी मिळाली होती. मात्र, त्याला चमक दाखवता आली नाही. त्यानंतर १६ सामन्यांत एक शतक आणि चार अर्धशतकांसह सर्वाधिक ६३५ धावा फटकावल्या. सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठीची ‘ऑरेंज कॅप’ मिळवतानाच त्याने चेन्नई सुपर किंग्जच्या जेतेपदात मोलाचा वाटा उचलला आहे. मुश्ताक अली टी-ट्वेन्टी डोमेस्टिक स्पर्धेतही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना फॉर्म राखला आहे. त्याने ५ सामन्यांत ५१.८ सरासरीने २५९ धावा जमवल्या आहेत.

ईशान किशन आणि वेंकटेश अय्यरकडूनही दमदार खेळ अपेक्षित आहे.प्रमुख गोलंदाजांना विश्रांती भारताने दुसऱ्या फळीसह नवोदित बॉलर्सना संधी दिली आहे. अनुभवी लेगस्पिनर युझवेंद्र चहल आणि राहुल चहरसह मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेल, आवेश खान आणि मोहम्मद सिराज यांच्या माध्यमातून यजमानांना संघबांधणीच्या दृष्टीने चाचणी घेता येईल.

Recent Posts

RCB vs RR, IPL 2025: आरसीबीचे राजस्थानला २०६ धावांचे आव्हान

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…

25 minutes ago

Simla Agreement: भारताने सिंधू नदीचे पाणी थांबवले तर पाकिस्तानकडून शिमला करार स्थगित करण्याची दर्पोक्ती! काय आहे हा शिमला करार?

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने पाकिस्तान संबंधित राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांवर काही…

34 minutes ago

महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल

१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…

57 minutes ago

प्रभासच्या नायिकेवर पाकिस्तानी सैन्याशी संबंध असल्याचा आरोप, पोस्ट शेअर करत म्हणाली- माझा कोणताही संबंध नाही

पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…

2 hours ago

Maharashtra Weather : सूर्य आग ओकणार! ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…

2 hours ago

INS सूरतवरुन यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…

2 hours ago