टी-२० या क्रिकेटच्या नव्या प्रकारात चालू असलेल्या सामन्यात भारताची गच्छंती झाली आणि क्रीडाविश्वात एकच खळबळ उडाली. अर्थातच ही खळबळ भारताच्या पराभवाबद्दल होती. पण आज बोलायचं आहे, ते भारताच्या यशापयशावर अवलंबून असणाऱ्या क्रिकेट विश्वातल्या अर्थकारणाविषयी, तर पाच दिवसांचं क्रिकेट म्हणजेच कसोटी सामने सव्वाशे ते दीडशे वर्षं गोऱ्या इंग्रजाच्या इंग्लंडमध्ये आणि त्यांच्या अंमलाखालील वसाहतीमध्ये फोफावल्या. मग एतद्देशीय त्या खेळात पारंगत झाले. पुढे पाच दिवसांच्या कसोटी सामन्यांची जागा एकदिवसीय मर्यादित षटकांच्या सामन्यांनी घेतली. निकालाची शंभर टक्के हमी, उत्कंठावर्धक खेळ, जीवघेणी स्पर्धा यामुळे प्रेक्षकवर्ग या सामन्यांकडे आकर्षित झाला. मग पुढे तेही अंगवळणी पडलं आणि एका नव्या फॉरमॅटचा जन्म झाला. तो म्हणजे टी-२०. तीन ते चार तासांत संपणारा हा खेळ २००३मध्ये जन्माला आला. अर्थात, पांढऱ्या कपड्यात क्रिकेटचा आनंद लुटणाऱ्या पूर्वसुरींनी नाकं मुरडली, पण क्रिकेट खेळणारे सर्वच देश आणि प्रेक्षक याच्या प्रेमात पडले. यामागे उत्कंठावर्धक खेळ एवढंच कारण नव्हतं, तर एक प्रचंड मोठं अर्थकारणही होतं.
दरवर्षी जसा गावात ऊरूस अथवा उत्सव भरतो, जत्रा लागते तशी ही २० षटकांच्या सामन्यांची करमणूकवजा खेळ अशी जत्राच आहे. याला एक अत्यंत सुनियोजित असं व्यवसायाचं स्वरूप आहे, जे यापूर्वी युरोपमधल्या फुटबॉल क्लब आणि अमेरिकेत इतर अनेक खेळांमध्ये विकसित झालं आहे. याच टी-२०चा जनक म्हणून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या सामन्यांकडे पाहता येईल. यात भाग घेणारे फ्रँचायझी जगातल्या कोणत्याही खेळाडूला त्याची किंमत मोजून आपल्या संघासाठी खेळायला आकर्षित करतात. ऑस्ट्रेलियाचा मायकेल क्लार्क, वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल आणि भारताचा सचिन तेंडुलकर अशा प्रकारची अनेक कॉम्बिनेशन्स इथे जशे दिसतात तसंच नवोदित खेळाडूंसाठी लाँचिंग पॅड म्हणून हा फॉरमॅट प्रचंड यशस्वी झाला. यामुळे क्रिकेटचा स्तर किती उंचावला, हा मुद्दा वादाचा; परंतु क्रिकेटच्या धंद्याचा स्तर नक्कीच उंचावला. कॅरी पॅकरने १९८०च्या दशकात एकदिवसीय सामन्याचं क्रांतिकारक पाऊल उचललं. त्याचचं हे अधिक गतिमान, अधिक नॅनो असं स्वरूप. क्रिकेट आता एक व्यवसाय म्हणून अमेरिकन आणि युरोपियन फ्रँचायझी स्पोर्ट्सच्या पावलावर पाऊल टाकत आहे.
‘स्पोर्ट्स इकॉनॉमिक्स’ ही इकॉनॉमिक्समधली वेगळी शास्त्र शाखा म्हणून विकसित होत आहे. या विषयाला वाहिलेली अनेक मासिकं परदेशातले क्रीडा वाचक नित्यनेमाने वाचत असतात. खेळाडूंची निवड, त्यांच्या खेळाचं मूल्यमापन आणि स्पर्धेतला त्यांचा सहभाग, धोरणात्मक व्यूहरचना हे एक वेगळंच विश्व आहे. स्पोर्ट्स इकॉनॉमिक्स म्हणजे काय? तर इकॉनॉमिक्स अर्थात अर्थशास्त्रामधल्या संकल्पना, तत्त्वं, गृहितकं, मॉडेल्स हे सर्व क्रीडाक्षेत्रात जाणीवपूर्वक शास्त्रोक्तरीत्या लावून पाहणं. यामध्ये प्रेक्षकांची मानसिकता, त्यांच्या आवडी-निवडी आणि एखादा खेळ इव्हेंट म्हणून सादर करण्याचं शास्त्र, असे मुद्दे अंतर्भूत आहेत. त्यामुळेच यात क्रिकेटच्या खेळातल्या आनंदापेक्षा नफा-तोट्याचा आधी विचार करून स्पर्धा भरवल्या जातात.
खेळाडूंवरील खर्च वजा जाता मिळणारा फायदा हे गुंतवणूकदारांचं प्रमुख लक्ष्य असतं. क्रीडा प्रकारावरची अव्यभिचारी निष्ठा किंवा सामाजिक बांधिलकी म्हणून ते गुंतवणूक करत नाहीत. त्यांच्यासाठी हा एक धंदा आहे. म्हणूनच ‘गंदा है, पर धंदा है’ असा त्यांचा नारा. पुढचा खेळाडू आपल्याला किती उत्पन्न मिळवून देईल, याकडेच त्यांचं लक्ष असतं. क्रिकेटचं एक चांगलं आहे. इथे सर्व गोष्टी तुम्हाला आकड्यांमध्ये मोजता येतात. म्हणजे चौकार, षटकार, धावा, षटकं, झेल, यष्टीचीत, बळी इत्यादी. म्हणूनच इकॉनॉमिक्समधली अनेक तत्त्वं इथे सुखनैव स्थिरावली. इतकी स्थिरावली की, शेरविन रोझेन आणि एडवर्ड लेझोर या दोघा नोबेल पारितोषिक विजेत्या अर्थतज्ज्ञांनी यावर संशोधन करून जगप्रसिद्धी मिळवली! म्हणजे पूर्वी डॉन ब्रॅडमन खेळायला यायचे, त्यावेळी झपाट्याने प्रेक्षक संख्या वाढायची. तिकीट विक्रीचं उत्पन्न दुप्पट-चौपट व्हायचं. पण म्हणून डॉन ब्रॅडमनना लिलावाचे तिप्पट-चौपट मिळाले, असं काही झालं नाही. कारण त्यावेळी क्रिकेट हा खेळ होता. आतादेखील तो खेळच आहे. फक्त त्याला धंदा या बिरुदाचं आक्रमण सहन करावं लागत आहे.
देशादेशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-२० सामन्यांमधला थरार खरा वाढला तो आयपीएलमुळे. यात सहभागी होणारे संघ म्हणजे तद्दन बाजारू नफ्यासाठी स्थापन झालेल्या अनेक कंपन्या आहेत. त्यात अनेक राजकारणी, उद्योजक, चित्रपट तारे-तारका आणि कदाचित अंडरवर्ल्डचे डॉनही सहभागी आहेत. इथे खेळाडूची किंमत ही मंडळी आणि त्यांचे सल्लागार ठरवतात. अशा मंडळींची स्टेडियममधली उपस्थिती सामन्याची स्टार व्हॅल्यू वाढवते. एखाद्या खेळाडूचं मूल्यमापन तो खेळत असलेल्या गोष्टींव्यतिरिक्त इतर अनेक मुद्द्यांवर ठरतं, हे सत्य आहे. हा एक करमणूक क्रीडाप्रकार बनला असल्याने या अर्थकारणाचं क्रिकेटच्या मूळ रूपावर प्रचंड आक्रमण झालं आहे. पूर्वी २५ आणि ५० रुपयांसाठी पंचरंगी सामने खेळणारे खेळाडू आणि त्यांचा जमाना केव्हाच गेला. आज सात ते आठ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम एकाच आयपीएल सीझनला मिळवणारे पंचवीसहून अधिक खेळाडू आहेत.या नव्या बिझनेस मॉडेलमध्ये प्रत्येकाच्या फायदा-तोट्याचा विचार झाला आहे. त्याच्यावर जबाबदारी फक्त एकच… प्रेक्षकांचं मनोरंजन करा, जाहिराती बघायला लावा आणि दोन-चार तासांच्या झटापटीत फटाफट पैसे कमवा!
आयपीएलच्या टायटल प्रायोजकाची गुंतवणूक आता तीन हजार कोटी रुपयांच्या पल्याड गेली आहे. या सामन्यांच्या प्रक्षेपणाचे अधिकार सोळा ते अठरा हजार कोटी रुपयांच्या आसपास विकले जात आहेत. यासाठी आयसीसी ही जागतिक क्रिकेट संघटना भारतावर म्हणजे इथल्या बाजारपेठेवर अवलंबून आहे. त्यामुळेच अशा एखाद्या टी-२० स्पर्धेतून भारताची लवकर गच्छंती झाली की, प्रेक्षकसंख्या रोडावरणार, हे उघड आहे. मग प्रायोजकांना त्यांच्या जाहिराती दाखवण्यातला रस कमी होणार, त्यांचं नुकसान होणार. मग या सगळ्या मॉडेललाच धक्का बसणार. त्यामुळे टी-२०मध्ये भारताने अखेरपर्यंत खेळणं ही क्रीडाविश्वाची आर्थिक गरज आहे. त्याशिवाय टी-२०चं अर्थचक्र चालूच शकत नाही. विजेत्या संघाला २० कोटी, उपविजेत्या संघाला १० कोटी, ज्या मैदानात हे सामने खेळले गेले त्यांच्यावर ५० लाख वगैरे गोष्टींची खैरात… सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, इतकंच काय, तर सर्वोत्तम स्टायलिश प्लेअर (क्रिकेटला रॅम्पवॉकप्रमाणेच तोललं गेलं ना) लाखा-लाखांची बक्षिसं आहेत. या सगळ्यात क्रिकेट कुठे हा प्रश्नच उपस्थित होत नाही. याचं कारण हा एका बिझनेस मॉडेलसाठी केलेला खटाटोप आहे आणि क्रिकेट हे त्याचं उपउत्पादन आहे. आता या उपउत्पादनाच्या संघाला २०१८च्या सामन्यांमधून ७५ ते २०० कोटी इतका प्रचंड नफा झाला. बीसीसीआयला २००० कोटी मिळाले आणि आयपीएलची ब्रॅण्ड व्ह्यॅल्यू ६.३ अरब डॉलर्स इतकी प्रचंड वाढली. तुमच्या लक्षात आलं असेलच की, आतापर्यंत क्रिकेट या विषयाची चर्चा केलेलीच नाहीये. त्यातल्या अर्थकारणाचीच चर्चा आहे!
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…