मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे मंत्री नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय वाकयुद्ध आता कोर्टाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. मंत्री नवाब मलिक यांची कन्या निलोफर खान यांनी गुरुवारी सकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसा यांना अब्रुनुकसानीसंदर्भात नोटीस धाडली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही नवाब मलिकांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेपार्ह वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी निलोफर खान यांनी केली आहे. तर, नवाब मलिकांनी ४८ तासांच्या आत आक्षेपार्ह ट्विट मागे घेऊन माफी मागावी, अशी मागणी अमृता फडणवीस यांनी केली आहे.
नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आरोप करताना, ड्रग्ज पेडलर जयदीप राणा याच्याकडून अमृता फडणवीस यांच्या अल्बमला अर्थसाहाय्य करण्यात आले होते, असा आरोप केला होता. त्यानंतर अमृता फडणवीस यांच्याकडून हे आरोप फेटाळण्यात आले होते. या आरोपानंतर अमृता फडणवीस चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी मलिकांना एक कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नवाब मलिक यांनी राणा आणि फडणवीस यांचे संबंध असल्याचा आरोप करण्याआधी ट्विटरवर भाजप आणि ड्रग्ज पेडलर यांच्या संबंधावर चर्चा करूया, असे म्हटले होते. मलिक यांनी या ट्विट प्रकरणी ४८ तासांत माफी मागावी अशी मागणी अमृता फडणवीस यांनी केली आहे. मलिक यांनी माफी न मागितल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
फडणवीसांना नोटीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नवाब मलिक यांची कन्या निलोफर खान यांनी अब्रुनुकसानीसंदर्भात नोटीस पाठवली आहे. मलिक यांचे जावई आणि निलोफर यांचे पती समीर खान यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले होते. हे आरोप निराधार असल्याचे मलिक आणि निलोफर खान यांनी म्हटले आहे. भाजपच्या अन्य नेत्यांवरही मलिकांनी आरोपांची मालिका सुरू केली आहे. अशा वेळी मलिक यांनी फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेला जयदीप राणाचा एक फोटो पोस्ट केला होता. हा जयदीप राणा ड्रग्स पेडलर असल्याचेही मलिक म्हणाले होते. त्यावरून आता अमृता फडणवीस यांनी मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.