Tuesday, December 3, 2024
Homeमहत्वाची बातमीएसटी संपाला हिंसेचे गालबोट

एसटी संपाला हिंसेचे गालबोट

२ शिवशाही बसवर दगडफेक; पुण्यात मुंडण आंदोलन

एकूण २०५३ कर्मचारी निलंबित

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज पाचवा दिवस आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप अनेक कर्मचाऱ्यांनी केला आहे. यातच कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण मिळाल्याचे दिसत आहे. नाशिकच्या महामार्ग बसस्थानकातील २ शिवशाही बसवर दगडफेक करण्यात आली आहे. एका बसची मागील काच फोडण्यात आली, तर दुसऱ्या बसचे लाईट फोडण्यात आले. दोन दुचाकींवरून आलेल्या काही अज्ञातांनी दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दगडफेक केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले व चौकशी सुरू केली. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या आंदोलनावर तोडगा काढायचा सोडून प्रशासनाने आतापर्यंत दोन हजारांहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामुळेदेखील सध्या राज्यात वातावरण तापलेले आहे. त्यातच सांगलीत एका एसटी कर्मचाऱ्याच्या निधनाच्या वार्तेमुळे आणखी वातावरण चिघळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आपल्या विविध मागण्यांसाठी लढा सुरू असलेले एसटी कामगार गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील आजाद मैदान परिसरात ठाण मांडून बसले आहेत. मात्र एसटीच्या विलीनीकरणाचा निर्णय झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचे विलीनीकरण करा या प्रमुख मागणीसाठी कर्मचारी आजाद मैदानावर आंदोलनासाठी बसले आहेत. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत येथून हलणार नाही असा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांपाठोपाठ आता भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते आजाद मैदान परिसरात हजेरी लावत आहेत व एसटी कर्मचारी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबतच रात्र काढली. गुरुवारी माजी मंत्री अनिल बोंडे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आ. संजय केळकर यांनी आजाद मैदान परिसरात येऊन संपाला पाठिंबा दिला.

तसेच राज्यातील विविध आगारांतील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत, तर जिल्हास्तरावर संबंधित कामगार न्यायालयात संपकरी कर्मचाऱ्यांच्या विरोधात दावे दाखल करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाने दिले आहेत.

सांगलीत कर्मचाऱ्याचे निधन

सांगलीत संपकरी एसटी कर्मचाऱ्याचे गुरुवारी राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दोन दिवसांपूर्वी सांगली बस स्थानकासमोर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. आज सकाळी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. राजेंद्र निवृत्ती पाटील (४६) असे त्यांचे नाव आहे. संप लांबत चालल्याने कर्मचारी तणावाखाली असल्याने आशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरकारने संपावर त्वरित तोडगा काढावा आणि मृत वाहकाच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे अशी मागणी केली जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -