Monday, April 21, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखशैथिल्य झटका; लसीकरण वाढवा

शैथिल्य झटका; लसीकरण वाढवा

अवघ्या मानव जातीचा संहारक म्हणून जगभरात बोकाळलेल्या महाभीषण कोरोना महामारीला समर्थपणे अटकाव करायचा असेल आणि कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखायची असेल, त्याचबरोबर जीवघेण्या कोरोनाशी दोन हात करण्यासाठी नागरिकांमधील रोग प्रतिकारक शक्ती वाढवायची असेल, तर प्रत्येकाचे लसीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. ही अत्यंत महत्त्वाची बाब ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला चालना दिली. त्यांनी प्रत्येक राज्याच्या मग ते विरोधी पक्षांचे सरकार असलेले राज्य असो की, स्वपक्षाचे, सर्व मुख्यमंत्र्यांशी त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून, कधी प्रत्यक्ष बैठक घेणे शक्य नसल्यास ऑनलाइन बैठक घेऊन लसीकरणाबाबतच्या सूचना दिल्या. लसीकरणाची मोहीम कशा पद्धतीने राबवावी, त्याची गती कशी कायम राखावी, लस पुरवठ्याबाबत काही प्रश्न निर्माण झाला असल्यास तो सोडविण्याबाबत त्यांनी संबंधितांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. एकूणच सर्व राज्यांना त्यांनी नेहमीप्रमाणे मदतीचा हात पुढे केला. सर्व राज्यांना लसींचा योग्य पुरवठा व्हावा, ऐनवेळी लसींचा तुटवडा जाणवू नये यासाठी लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना आवश्यक त्या सर्व परवानग्यांसह अन्य बाबींची पूर्तता पंतप्रधानांच्या सूचनेनुसार केंद्रामार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे लसींचे उत्पादन अविरत सुरू राहिले आणि देशभरात ऐतिहासिक आणि विक्रमी लसीकरण होऊ शकले हे निश्चित.

देशातील ७५ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळालेला आहे आणि जवळपास ३१ टक्के लोकांना दोन्ही डोस मिळून लसीकरण पूर्ण झाले आहे. देशात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण ६५ कोटींहून अधिक नागरिकांना लसीचे डोस दिले गेले आहेत. यातील ५०.३१ कोटी नागरिकांना कोरोनावरील लसीचा पहिला डोस दिला गेला आहे, तर १४.९४ कोटी नागरिकांना लसीचे दोन्ही डोस दिले गेले आहेत.

या विक्रमानंतर जगभरात देशाचे नाव झाले आणि अनेकांनी आपले सहाय्य घेऊ केले. हे सर्व शक्य झाले ते पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टी असलेल्या आणि सक्षम नेतृत्वामुळेच. तरी महाराष्ट्रानेही अलीकडेच ९ नोव्हेंबर रोजी १० कोटी लोकांच्या लसीकरणाचा टप्पा पार पाडला. तसेच मुंबई महापालिकेकडून मुंबईत कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली आणि दुसरी मात्रा मिळून बुधवारी १० नोव्हेंबर रोजी दीड कोटी मात्रा पूर्ण करण्यात आल्या. यात मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरणाचा समावेश आहे. मात्र असे असूनही आपला देश आता कोरोना वायरसपासून सुरक्षित आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. तज्ज्ञांनुसार भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. कोरोनाची लस ही विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका कमी करते आणि कोविड झाल्यास गंभीर आजारपण रोखते. मात्र आता वायरसचा जो डेल्टा व्हेरिएंट आहे तो मूळ कोरोना विषाणूपेक्षा आक्रमक आहे आणि वेगाने पसरत आहे. ज्यामुळे कोविड संक्रमणाचा धोका अधिक वाढतो.

काही देशांमध्ये डेल्टा प्लस या कोरोना विषाणू व्हेरिएंटचे संक्रमण सुरू झाले आहे. विशेष म्हणजे ब्रिटनमध्ये ८९ टक्के लोकांचं लसीकरण झालेले आहे. मात्र डेल्टा व्हेरिएंटमुळे तिथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ब्रिटनमध्ये दररोज ४०,००० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत आहे. अमेरिकेत आतापर्यंत जवळपास फक्त ५० टक्के लोकांचे लसीकरण झालेले आहे. जगभरातल्या तज्ज्ञांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर मतभेद आहेत. लस कोरोना विषाणू तसेच व्हेरिएंट्सविरुद्ध किती प्रभावी आहे याचेही चित्र स्पष्ट नाही. त्यामुळे सरकारने, आरोग्य विभागाने आणि लोकांनी तेवढीच काळजी घेणे गरजेचे आहे. येणारे काही सणवार आणि बाजारपेठांमध्ये सुरू झालेली लोकांची गर्दी पाहता जास्त सतर्क राहण्याची गरज आहे.

शाळा, महाविद्यालये, मंदिरं आता खुली झाली असून सर्व ठिकाणी लोकांची गर्दीही वाढू लागली आहे. भारतात १६ जानेवारीला २०२१ला लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आणि १० महिन्यांत १०० कोटींचा टप्पा पार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२१ आखेरपर्यंत १०० टक्के पात्र लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. महाराष्ट्राने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत एकूण ६ कोटी ५५ लाखांवर लोकांना डोस दिले असून देशात सर्वाधिक १ कोटी ७९ लाख नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देऊन विक्रम केला आहे. कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य शासनाने लसीकरण मोहिमेला गती दिली असली तरी गेले काही दिवस लसीकरणाच्या मोहिमेत मोठ्या प्रमाणात शैथिल्य आलेले दिसत आहे. यापूर्वी केंद्राकडून लसींचा योग्य पुरवठा होत नसल्याची ओरड राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून वारंवार केली जात होती. म्हणजेच प्रत्येक गोष्टीत केंद्राकडे बोट दाखविण्याची सवय राज्यातील सरकारला लागली होती व त्याचा प्रत्यय याही वेळी आला. आता तसे कोणतेही कारण दिसत नाही, कारण लसींचा सर्वाधिक आणि अविरत पुरवठा महाराष्ट्राला होत आहे. त्यामुळे राज्याने आपल्या आरोग्य यंत्रणेला गती देण्याची आणि सध्या मंद गतीने सुरू असलेले लसीकरण वेगाने व्हावे यादृष्टीने कंबर कसणे गरजेचे आहे. शहरांबरोबरच दूरवरच्या गाव – खेड्यांतील लोकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती होणे आणि त्यांची सोय करणे याकडे विशेष लक्ष पुरविण्याची गरज अधोरेखित होत आहे. म्हणजेच, लसीकरणाच्या मोहिमेला आलेले शैथिल्य दूर करून गती वाढविणे आवश्यक आहे. तसे झाले तरच पंतप्रधान मोदींनी २०२१ अखेरपर्यंत १०० टक्के पात्र लोकांचे लसीकरण करण्याचे ठेवलेले उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -