Wednesday, July 3, 2024
Homeताज्या घडामोडीआर्यन खानची एनसीबी कार्यालयात हजेरी

आर्यन खानची एनसीबी कार्यालयात हजेरी

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अडकलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई कार्यालयात हजेरी लावली. वकिलांसह तो एनसीबी कार्यालयात आला होता. आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून तो माघारी परतला. मुख्य म्हणजे आर्यनचा १३ नोव्हेंबर रोजी वाढदिवस असून त्याला तपास यंत्रणेला सामोरे जावे लागले.

दरम्यान, ड्रग्ज पार्टी प्रकरणामुळे आर्यनचा वाढदिवस यंदा साधेपणानेच घरात साजरा केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. जवळपास एक महिना त्याला कोठडीत काढावा लागला. त्याची सध्या जामिनावर सुटका झाली असून जामीन मंजूर करताना मुंबई हायकोर्टाने त्याला १४ अटी घातल्या आहेत. त्यातील एक प्रमुख अट म्हणजे दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत त्याला एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार गेल्या शुक्रवारी आर्यन एनसीबी कार्यालयात आला होता. त्यानंतर आजही आर्यनने एनसीबीपुढे हजेरी लावली.

आर्यन आज एनसीबी कार्यालयात आला तेव्हा त्याच्यासोबत त्याचे वकील होते. एनसीबीसमोर येऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून तो माघारी परतला. यावेळी माध्यमांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, आर्यनने माध्यमांना टाळले. आर्यनच्या आधी याच प्रकरणातील अन्य एक आरोपी मुनमून धामेचा हिनेही एनसीबी कार्यालयात हजेरी लावली.

दरम्यान, ड्रग्ज पार्टी प्रकरणाला गंभीर वळण लागलेले आहे. यात खंडणीचा आरोप करण्यात आलेला आहे. आर्यनवर गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच त्याच्या सुटकेसाठी २५ कोटींची खंडणी मागण्यात आली होती, असा याच प्रकरणातील पंच साक्षीदार प्रभाकर साईल याचा आरोप आहे. तसे प्रतिज्ञापत्रच त्याने दिले आहे. त्याने किरण गोसावी, सॅम डिसूझा या दोघांसह एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे नाव घेतले आहे. याचा तपास मुंबई पोलीस आणि एनसीबीचं पथक यांच्याकडून स्वतंत्रपणे सुरू आहे. या प्रकरणात शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिला समन्स बजावण्यात आले असून तिच्यासह आर्यनचा जबाब नोंदवला जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -