हॉटेलचे खाद्यपदार्थ २० टक्क्यांनी महागणार
मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना महामारी आणि त्यानंतर लावण्यात आलेली टाळेबंदी याचा मोठा फटका सर्व स्तरातील लोकांबरोबरच हॉटेल – रेस्टॉरंट व्यावसायिकांनाही बसला. गेल्या दीड वर्षात राज्यात अनेक महिने बहुतांश ठिकाणी हॉटेल-रेस्टॉरंट सेवा ही बंद राहिली, जी सुरू होती ती रडत-खडत सुरू होती. वीजबील, जागेचे भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार यामुळे या हॉटेल-रेस्टॉरंट व्यावसायिकांचे कंबरडे साफ मोडले होते. त्यातच वाढत्या महागाईमुळे या व्यवसायाशी संबंधित सर्वच गोष्टींचे दर हे वाढले आहेत. त्यामुळे आता यापुढे हॉटेल- रेस्टॉरंटमधील खाद्य पदार्थांचे दर वाढवण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे हॉटेल-रेस्टॉरंटशी संबंधित संघटना ‘आहार’ने स्पष्ट केले आहे.
‘दरवर्षी साधारण जून महिन्यामध्ये हॉटेल-रेस्टॉरंटमधील खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होते. गेली दोन वर्षे ही वाढ झालीच नाही, तर दुसरीकडे सर्वसामान्यांना कोरोनाचा फटका बसला आहे. तेव्हा दरवाढ करताना याचाही विचार केला जाईल’, असे मत ‘आहार’चे उपाध्यक्ष निरंजन शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.
‘या आधीच अनेक हॉटेल- रेस्टॉरंट यांनी दरवाढ केलेली आहे व करत आहेत. कोरोना काळामुळे हॉटेल-रेस्टॉरंट व्यवसाय हा पाच वर्षे मागे गेलेला आहे. दोन वर्षांतील परिस्थिती आणि त्यात महागाई यामुळे खाद्य पदार्थांच्या दरात किमान २० टक्के एवढी दरवाढ ही अपेक्षित आहे. ही दरवाढ करताना सर्वसामान्य ग्राहकांचाही विचार केला जात आहे’, असे ‘आहार’चे सरचिटणीस सुकेश शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
तेव्हा जर तुम्ही हॉटेल- रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि खाद्यपदार्थांचे दर वाढलेले असतील तर मुळीच आश्चर्य वाटायला नको.