मुंबई (प्रतिनिधी) : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणासह एकूण सहा प्रकरणांचा यापुढील तपास ‘एनसीबी’ची एसआयटी करणार आहे. हे अधिकारी मुंबईत दाखल होताच त्यांनी संबंधित प्रकरणांचा तपास एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे व अन्य अधिकाऱ्यांकडून हाती घेतला असून मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्याशी संबंधित प्रकरणात पहिला समन्स मंगळवारी बजावण्यात आला आहे.
मुंबईतील क्रूझ पार्टी, समीर खान, अरमान कोहली प्रकरण व अन्य तीन प्रकरणांचा तपास करण्यासाठी एनसीबी महासंचालकांनी विशेष तपास पथक नेमले आहे. एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंह हे या पथकाचे प्रमुख आहेत. या पथकाने मुंबईत दाखल होत तपास सुरू केला असून समीर खान प्रकरणात पहिला समन्स बजावण्यात आल्याचे वृत्त पुढे आले आहे. समीर खान यांच्याशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला व्यावसायिक करण सजनानी याला विशेष तपास पथकाने समन्स बजावले आहे. ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी बुधवारी तपास पथकासमोर हजर राहावे, असे समन्समध्ये नमूद करण्यात आले आहे.