
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील बहुचर्चित पद्म पुरस्कार वितरण सोहळा आज राजधानी दिल्लीत पार पडला. यंदा सात मान्यवरांचा ‘पद्म विभूषण’, १० मान्यवरांचा ‘पद्मभूषण’ आणि १०२ जणांचा ‘पद्मश्री’ पुरस्कारांसह गौरव करण्यात आला आहे, तर १६ जणांना मरणोत्तर ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण पार पडले. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार ‘पद्म विभूषण’ प्राप्त मान्यवरांत दीर्घकाळापर्यंत जपानचे पंतप्रधान पद भूषणवणारे शिंजो आबे यांचाही समावेश आहे.
पार्श्वगायक एस. पी. बालासुब्रमण्यम (मरणोत्तर) यांना पद्म विभूषण तर आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई (मरणोत्तर), माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (मरणोत्तर), आणि माजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांची मुलगी बान्सुरी स्वराज यांनी आपल्या आईच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
याशिवाय एकूण १० जणांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई (मरणोत्तर), माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (मरणोत्तर) आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याशिवाय गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल (मरणोत्तर), भारतीय इस्लामिक विद्वान कल्बे सादिक (मरणोत्तर), पंतप्रधानांचे माजी सचिव नृपेंद्र मिश्रा, समाजसेवक तरलोचन सिंग, शास्त्रीय गायक के. एस. चित्रा, चंद्रशेखर कंबारा, रजनीकांत देवीदास श्रॉफ यांचा समावेश आहे.
तसेच माजी राज्यपाल मृदुला सिन्हा (मरणोत्तर) आणि माजी केंद्रीय मंत्री बिजॉय चक्रवर्ती यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच ब्रिटिश चित्रपट दिग्दर्शक पीटर ब्रूक, फादर वलिस (मरणोत्तर), प्राध्यापक चमन लाल सप्रू (मरणोत्तर) यांच्यासह एकूण १०२ व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कलाकारांचाही गौरव
त्याचबरोबर कंगना राणावत, सरिता जोशी, गायक अदनान सामी यासहीत अनेक कलाकारांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष बाब म्हणजे ‘पद्म’पुरस्कार विजेत्यांमध्ये २९ महिलांचा तर एका ट्रान्सजेंडर व्यक्तीचा समावेश आहे. तसेच १० व्यक्ती अनिवासी भारतीय, भारतीय वंशाच्या आणि भारताचे परदेशी नागरिक आहेत.
मेरी कोम, पी. व्ही. सिंधूचाही गौरव
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी एकूण सात खेळाडूंना पद्म पुरस्काराने सन्मानित केले. भारताची सर्वात यशस्वी महिला बॉक्सर मेरी कोम हिला पद्मविभूषण (२०२०) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मेरी कोमने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. याशिवाय तिने पाच वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक तसेच एक रौप्य आणि कांस्य पदक जिंकले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारी भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सिंधूने रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्येही रौप्य पदक जिंकले होते. एकेरी स्पर्धेत भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी ती पहिली महिला आणि एकूण दुसरी भारतीय व्यक्ती ठरली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खानला पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. २०११च्या विश्वचषक विजेत्या संघाचा तो महत्वाचा भाग होता. मणिपूरची फुटबॉलपटू ओइनाम बेंबिम देवी हिला पद्मश्री पुरस्कार-२०२० ने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय महिला फुटबॉलला एका नव्या उंचीवर नेण्यात बेंबिम देवीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.