शेवटच्या साखळी सामन्यात आज स्कॉटलंडशी गाठ
शारजा (वृत्तसंस्था) : टी-वर्ल्डकपच्या सुपर-१२ फेरीतील (ग्रुप २) रविवारच्या दुसऱ्या सामन्यात जबरदस्त फॉर्मात असलेला पाकिस्तानचा संघ स्कॉटलंडशी दोन हात करेल. कमकुवत प्रतिस्पर्धी पाहता बाबर आझम आणि सहकाऱ्यांना सलग पाचवा विजय नोंदवण्याची संधी आहे.
यूएईत सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये केवळ दोन संघांना विजयाचा चौकार लगावता आहे. त्यात ग्रुप २मधील पाकिस्तान एक संघ आहे. त्यांनी माजी विजेता आणि परंपरागत प्रतिस्पर्धी भारताला हरवून विजयी प्रारंभ केला. त्यानंतर न्यूझीलंड, नामिबिया आणि अफगाणिस्तान यांना ओळीने हरवले. दिमाखात सेमीफायनल प्रवेश केलेला पाकिस्तान संघ सुपर-१२ फेरीतील सलग पाचवा विजय मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल, हे नक्की. त्यामुळे स्कॉटिश संघाविरुद्ध पाकिस्तानचे पारडे निश्चितच जड आहे.
पाकिस्तानची सर्व आघाड्यांवरील कामगिरी चांगली होत आहे. कर्णधार आझम आणि सलामीवीर मोहम्मद रिझवानने ४ सामन्यांत अनुक्रमे ३ आणि २ अर्धशतके ठोकताना फलंदाजीचा भार समर्थपणे पेलला आहे. सलामी दुकलीचा जबरदस्त फॉर्म पाहता मधल्या फळीतील मोजक्याच फलंदाजांना मैदानावर उतरण्याची वेळ आली आहे. त्यात असिफ अलीसह मोहम्मद हफीझ, फखर झमन आणि शोएब मलिकने छोटेखानी परंतु, महत्त्वपूर्ण खेळी करताना आझम आणि रिझवानची फटकेबाजी व्यर्थ होऊ दिलेली नाही. गोलंदाजीत हॅरिस रौफने बऱ्यापैकी सातत्य राखले आहे. त्याला शाहीन शाह आफ्रिदी, इमाद वासिम आणि हसन अलीची चांगली साथ लाभली आहे.
पाकिस्तान संघ विजयाचा पंच लगावण्यासाठी प्रबळ दावेदार असतानाच स्कॉटलंडसमोर सलग पाचवा पराभव टाळण्याचे आव्हान आहे. पहिल्या फेरीत चमकदार कामगिरी करून अव्वल १२ संघात (सुपर-१२ फेरी) स्थान मिळवले तरी अनुभवी आणि बलाढ्य संघांसमोर डाळ शिजली नाही. सात सामन्यानंतर केवळ रिची बॅरिंग्टनला अर्धशतक झळकावता आलेले आहे. मात्र, उर्वरित ६ डावांत तो तीन वेळा शून्यावर बाद झाला आहे. कर्णधार काइल कोइत्झर, जॉर्ज मुन्सी, क्रॉस, लीक या प्रमुख फलंदाजांना प्रभाव पाडता आलेला नाही. गोलंदाजीत डॅव्ही, व्हीलने थोडी फार चांगली गोलंदाजी केली आहे. मात्र, अन्य गोलंदाज अपयशी ठरलेत. पाकिस्तानसारखा तुल्यबळ प्रतिस्पर्धी पाहता स्कॉटिश संघासमोर आणखी एक पराभव टाळण्याचे मोठे आव्हान आहे.
वेळ : सायं. ७.३० वा.