Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

मुंबई जगातले ७वे प्रदूषित शहर

मुंबई जगातले ७वे प्रदूषित शहर

सीमा दाते


मुंबई : दिवसेंदिवस मुंबईतील प्रदूषण चिंताजनक स्तरावर पोहचले आहे. त्यातच दिवाळीच्या आतषबाजीमुळे मुंबईतील प्रदूषणाने उच्च पातळी गाठली आहे. जागतिक हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार शुक्रवारी मुंबई जगातील ७ वे प्रदूषित शहर ठरले आहे.


दिवाळी सुरू झाल्यापासून मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळताना पाहायला मिळाली; तर प्रदूषणाची पातळी मात्र वाढताना पाहायला मिळत आहे. लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक १६९ नोंदवला गेला आहे. यानुसार मुंबई शहर हे जगातील ७व्या क्रमांकाचे प्रदूषित शहर ठरले आहे. तर पहिल्या क्रमांकावर ४२६ हवा गुणवत्ता निर्देशांकासह दिल्ली शहर सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे.


दिवाळीच्या दिवसांमध्ये गुरुवारी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक हा मध्यम म्हणजेच १६२ नोंदविला गेला होता तर कुलाबा २९० आणि बीकेसी २९० हवा गुणवत्ता निर्देशांकासह हवेचा स्तर वाईट नोंदविला गेला होता. तसेच नवी मुंबई हवा गुणवत्ता निर्देशांक ११८, अंधेरी १३५, चेंबूर १६२, बोरिवली १४२ निर्देशांकासह मध्यम तर वरळी येथे हाच निर्देशांक ९५ निर्देशांकासह समाधानकारक नोंदविला गेला आहे.


दरम्यान शनिवारी देखील पुन्हा एकदा प्रदूषणाची पातळी वाढली आहे. सुरवातीला जास्त प्रदूषण हे दक्षिण मुंबईत असून कुलाबा ३२८, माझगाव ३०९, बीकेसी ३०५ हवा गुणवत्ता निर्देशांकासह हवेचा अतिशय वाईट स्तर नोंदवला गेला. अंधेरी २३५, चेंबूर २०८ हवा गुणवत्ता निर्देशांक वाईट तर भांडुप १०२, मालाड १३२, वरळी १४५, बोरीवली १६७, नवी मुंबई १३९ येथे मध्यम हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवला गेला.


जागतिक हवा गुणवत्ता निर्देशांक (५ नोव्हेंबर)


        मुख्य शहरे        देश                एक्यूआय

  1. दिल्ली             भारत                  ४२६

  2. लाहोर              पाकिस्तान          २४६

  3. बीजिंग             चीन                    २१२

  4. बुशकेक           कर्गिस्तान             १८८

  5. कराची             पाकिस्तान            १८२

  6. शिन्यांग           चीन                    १७१

  7. मुंबई                भारत                  १६९

Comments
Add Comment