Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

महिलांसाठी बेस्टची ‘लेडीज फर्स्ट’ सेवा सुरू

महिलांसाठी बेस्टची ‘लेडीज फर्स्ट’ सेवा सुरू

मुंबई (प्रतिनिधी) : बेस्ट उपक्रमाची लेडीज फर्स्ट सेवा शनिवारपासून महिलांच्या सेवेत दाखल झाली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते शनिवारी या सेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला असून या बस महिलांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. शनिवारी खास भाऊबीजेच्या दिवशीच महिलांना बेस्टकडून गिफ्ट देण्यात आले आहे.


बेस्टने दररोज ३० लाखांच्या आसपास प्रवासी प्रवास करतात. यात नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या महिलांचा प्रवास जास्त सुखकर व्हावा या हेतूने बेस्ट उपक्रमाने लेडीज फर्स्ट ही खास महिला प्रवाश्यांसाठी सेवा सुरू केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दादर, प्लाझा सिनेमा जवळील बस थांब्याजवळ या सेवेचे लोकार्पण केले. नोव्हेंबर २०१९ पासून महिलांसाठी आरक्षित बस 'तेजस्विनी' नावाने टप्प्याटप्प्यात ताफ्यात येऊ लागल्या. आजघडीला साधारण ३७ 'तेजस्विनी' धावत आहेत. मात्र सध्या बेस्टमधील प्रवाशांची गर्दी वाढली आहे. हे पाहता महिलांसाठी १०० बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.


बेस्टच्या २७ आगारांतून या बस सुटणार आहेत. सध्या ७० बस सुरू आहेत; तर उर्वरित बस लवकरच सुरू होणार आहेत. दरम्यान यामध्ये ९० बस या वातानुकूलित असणार आहेत. सध्या शहरातील विविध मार्गावर बेस्टच्या ३७ महिला स्पेशल बस धावतात. त्यात या १०० बसची भर पडल्यामुळे एकूण महिला स्पेशल बसची संख्या १३७ होणार आहे. यामुळे गर्दीच्या वेळेस महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment